इटलीत १४१ वर्षांची शिक्षा, पण रत्नागिरीत ‘रेड कार्पेट’? एमपीसीबीच्या नोटीसला ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ची केराची टोपली!

लोटे एमआयडीसीतील विषारी रसायन प्रकल्पाचा वाद पेटला; २ महिने उलटूनही कंपनीचे मौन, प्रशासन कोणाच्या दाबावाखाली?

रत्नागिरी : एकीकडे कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास होत असल्याची ओरड सुरू असतानाच, आता खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत (Lote Parshuram MIDC) एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आखाती देशांत आणि युरोपात प्रतिबंधित केलेली, नागरिकांच्या जीवावर उठणारी यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञान ‘लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज’ (Laxmi Organic Industries) मार्फत रत्नागिरीत वापरले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बजावलेल्या नोटीसला कंपनीने चक्क ‘केराची टोपली’ दाखवली असून, दोन महिने उलटूनही कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे कंपनीला नेमके कोणाचे अभय आहे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

इटलीतील ‘मिटेनी’ कनेक्शन आणि धोक्याची घंटा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, इटलीतील व्हेनेटो प्रांतात ‘मिटेनी’ (Miteni) नावाची कंपनी कार्यरत होती. ही कंपनी PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) या अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन करत होती. याला ‘फॉरेव्हर केमिकल्स’ (Forever Chemicals) असेही म्हणतात, कारण ही रसायने निसर्गात आणि मानवी शरीरात कधीही नष्ट होत नाहीत.

इटलीतील विध्वंस : या रसायनांमुळे इटलीतील साडेतीन लाख लोकांचे पाण्याचे स्रोत दूषित झाले. यामुळे नागरिकांमध्ये कर्करोग (Cancer), हार्मोनल विकार आणि वंध्यत्व यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढले.

जेलवारी : हे प्रकरण इतके गंभीर होते की, जून २०२५ मध्ये इटलीच्या न्यायालयाने या कंपनीच्या ११ माजी अधिकाऱ्यांना एकूण १४१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

रत्नागिरीत काय सुरु आहे?

इटलीत काळ्या यादीत टाकलेल्या याच कंपनीची यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स आता ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’च्या उपकंपनीमार्फत लोटे एमआयडीसीत वापरले जात असल्याचा आरोप होत आहे.

एमपीसीबीच्या नोटीसची थट्टा?

या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ४ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला नोटीस बजावली होती. मात्र, आज डिसेंबर संपत आला तरी कंपनीने या नोटीसला कोणतेही समाधानकारक किंवा असमाधानकारक उत्तर दिलेले नाही. शासकीय नोटीसला दोन-दोन महिने उत्तर न देण्याइतपत कंपनी प्रशासन मुजोर झाले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जर कंपनी प्रशासनाने एमपीसीबीला जुमानले नाही, तर प्रदूषण नियंत्रण मंडळ आता काय कारवाई करणार? की केवळ कागदी घोडे नाचवून गप्प बसणार? हा खरा प्रश्न आहे. ४ ऑक्टोबरला दिलेल्या नोटीसचे उत्तर न देणाऱ्या कंपनीवर अद्याप कारवाई का झाली नाही? कंपनीला पाठीशी घालणारे ‘हात’ कोणाचे आहेत? याची जोरदार चर्चा सध्या कोकणात सुरू आहे.

नागरिकांमध्ये संतापाची लाट

सोशल मीडियावर या कंपनीविरोधात व्हिडिओ व्हायरल झाल्याने स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. “इटलीत पाणी नासवणारे तंत्रज्ञान आमच्या कोकणात नको,” अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. राज्य शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:37 PM 26/Dec/2025