खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत धोकादायक ठरलेल्या भोस्ते घाटातील काही भागात संरक्षक भिंत उभारण्याचे काम ठेकेदार कंपनीने सुरू केले आहे. भोस्ते घाट हा अपघातप्रवण भाग म्हणून ओळखला जातो. या घाटातील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या डाव्या बाजूला खोल दरी असून सातत्याने होणाऱ्या अपघातांची दखल घेत अखेर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. घाटात वाहनांचे नियंत्रण सुटून दरीत कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी ही महत्त्वाची उपाययोजना मानली जात आहे.
भोस्ते घाटात यापूर्वी गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बाजूवर गतिरोधक उभारण्यात आले आहेत. मात्र, गतिरोधक असूनही अनेक वाहनांचे अपघात येथे झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी, पावसाळ्यात, तसेच भरधाव वेगामुळे या घाटातील वळणे चालकांसाठी अधिकच धोकादायक ठरत होती. त्यामुळे केवळ गतिरोधक पुरेसे नसन भक्कम संरक्षक भिंतीची गरज असल्याची मागणी सातत्याने होत होती.
दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात राहिलेल्या काही त्रुटींमुळेही धोके वाढल्याचे चित्र आहे. अपुरी संरक्षक साधने, अपुरे दिशादर्शक फलक आणि तीव्र वळणे यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामामुळे भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांसह स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 26/Dec/2025














