Ratnagiri : जिल्ह्यात ५७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, शेतकरी विमा परताव्याच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेतून नुकसान भरपाई देण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल सव्वा दोन हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढला आहे. मात्र पावसाने ५७९ हेक्टरवरी पिकांचे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई अद्याप एकही रूपये मिळालेली नसून त्यामुळे शेतकरी विमा परताव्याच्या प्रतिक्षेत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली मात्र जून ते ऑक्टोबरच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, खरीप हंगामातील विमा योजनेला जिल्ह्यातून फारसा प्रतिसाद मिळत नाही. शासनाने नैसर्गिक आप्पतीमध्ये बाधित झालेल्या भात शेतीलाही विमा परतावा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मागील वर्षात काही परिस्थिती बदलली आहे. तीन वर्षात खरीप हंगामात विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. २०२५-२६ या अर्थिक वर्षातील खरीप हंगामात २ हजार २५७ शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. त्याचे ५७९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. यामध्ये भाताचे २ हजार १७६ शेतकऱ्यांचे ५५४ हेक्टर क्षेत्र तर नागलीतील ८१ शेतकऱ्यांचे २५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. त्यापोटी शेतकऱ्यांनी प्रीमियम रक्कमही भरलेली आहे.

जिल्ह्यातील २० हजार ८११ शेतकऱ्यांचे ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यापोटी ४ कोटी रूपयांची मदत शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली. शासनाची मदत पोहोचली तरीही विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना अजूनही लाभांश देण्यात आला नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे विमा काढला, हप्ता भरला आणि पिकांचे नुकसानही झाले तरीही पिकपाणी प्रयोग न झाल्याने किंवा सरासरी उत्पादनात नुकसान कमी दाखवले गेल्याने भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडले असून पिक विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

यंदाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना परतावा निश्चितच मिळेल. जिल्ह्यातील पिककापणी प्रयोगातील आकडेवारी ऑनलाईन भरण्यात येत आहे. त्यामुळे विमा कंपनी निकषानुसार पुढील घेईल. यंदा शासनाने एकाच निकषावर आधारित विमा परतावा देण्याचे निश्चित केले आहे-शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

शासनाने पिककापणी प्रयोग अन निकष ठरला
शासनाने विमाभरपाईसाठी पिककापणी प्रयोग हाच मुख्य आणि एकमेव निकष ठरवला आहे. जिल्ह्यात भाताचे क्षेत्र ५१ हजार हेक्टरइतके आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाने ९०० हून अधिक ठिकाणी पिककापणी प्रयोग केले आहेत. ज्याठिकाणी पिककापणी प्रयोग झाले तेथे नुकसान नोंदले गेले तरच तेथील विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे पिककापणी प्रयोगातील मिळालेल्या उत्पादनावर विमा उरतवलेल्या शेतकऱ्यांना परतावा अवंलबून राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 26/Dec/2025