संगमेश्वर ः बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वस्तीपासून १ किमीच्या आत पहिली ते पाचवीचे शिक्षण व तीन किमीच्या आत आठवीपर्यंतचे शिक्षण मिळणे, हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे; मात्र संचमान्यता शासननिर्णयाची अंमलबजावणी झाल्यास बालकाच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येणार आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी देवरूख येथील माटे भोजने सभागृहात शनिवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता एका बैठकीचे आयोजन केले आहे.
ग्रामीण बहुसंख्य शाळांमध्ये पहिली ते पाचवी एक नियमित शिक्षक तर पहिली ते सातवी-आठवीच्या शाळांमध्ये दोन नियमित शिक्षक व एखादा कंत्राटी शिक्षक कार्यरत राहतील. परिणामी, शाळा आहे; पण पुरेशा शिक्षकांअभावी शिक्षण नाही, अशी परिस्थिती उद्भवू शकते. या संदर्भात साकल्याने विचार करून मार्ग काढणे आवश्यक आहे. यासाठी सकाळी ११ वाजता देवरूख येथील खेतल सभागृह येथे संगमेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य, सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व मुख्याध्यापक व सहशिक्षकांची संयुक्त सभा आयोजित केली आहे. सभेत संचमान्यता शासननिर्णयाची माहिती देणे, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षण बचाव संघर्ष समिती स्थापन करणे, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षण बचाव लढ्याची पुढील दिशा ठरवणे आदी विषय मांडण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 27-12-2025














