खेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! वेरळमध्ये मुंबईकराचे बंद घर फोडले; सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह ३ लाख ६० हजारांवर डल्ला

खेड/रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात घरफोडीच्या (House Break-in) घटनांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी आता वेरळ खडकवाडी येथील एका मुंबईकर चाकरमान्याच्या बंद घराला लक्ष्य केले आहे. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील ३ तोळे सोने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना २४ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान घडली असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश दिलीप पवार (वय ३६) हे मूळचे वेरळ खडकवाडी (ता. खेड) येथील असून, सध्या ते व्यवसायानिमित्त घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे वेरळ येथील घर बंद होते. दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता ते २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने दिनेश पवार यांच्या घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने कापले आणि घरात प्रवेश केला. यानंतर घरातील कपाट आणि ड्रॉवर उचकटून त्यातील मौल्यवान वस्तूंची शोधाशोध केली.

सोन्यासह रोख रक्कमेची चोरी

चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेला. चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा तपशील खालीलप्रमाणे: १) सोन्याची चेन: सुमारे २ तोळे वजनाची (जुनी वापरती) – किंमत रु. २,००,०००/- २) सोन्याची अंगठी: सुमारे १ तोळा वजनाची (जुनी वापरती) – किंमत रु. १,००,०००/- ३) रोख रक्कम: रु. ६०,०००/-
एकूण चोरी: रु. ३,६०,०००/- (तीन लाख साठ हजार रुपये)

अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर दिनेश पवार यांनी २५ डिसेंबर रोजी रात्री उशिरा खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ (BNS) चे कलम ३०५ (घरफोडी/चोरी), ३३१(३) आणि ३३१(४) (रात्रीच्या वेळी लपून घरात प्रवेश करणे व घरफोडी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे (गुन्हा रजिस्टर नंबर ३८६/२०२५).

सुट्ट्यांच्या कालावधीत अनेक मुंबईकर गावी येत असतात, मात्र बंद घरे हेरून चोरटे आपले काम साधत असल्याने खेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 27-12-2025