दापोली : दापोली तालुक्यातील मांदिवली-चिंचघर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ओव्हरलोड डंपरचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या अपघातामुळे परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मांदिवली पुलावर १८ टनांपेक्षा जड वाहनांना बंदी असतानाही संबंधित डंपर सुमारे २५ ते ३० टन माल वाहून नेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. डंपरचे स्वतःचे वजनच सुमारे १० टन असल्याने एकूण ३५ ते ४० टन इतकी जड वाहतूक या मार्गावर सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या ओव्हरलोड डंपरची भरधाव वाहतूक सुरू असल्यामुळे रस्ते आणि पूल धोक्यात आले असून, भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
या बाबत नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. ओव्हरलोड वाहतूक थांबवण्यासाठी कायमस्वरूपी तपासणी यंत्रणा उभारावी, तसेच नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा ओव्हरलोड वाहतुकीचा धोका स्पष्ट झाला असून, प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 27/Dec/2025














