पावस : आपल्या भागातील कृषी व पशुसंवर्धनमधील सध्याची परिस्थिती व शेतकऱ्यांच्या सध्याच्या समस्या व त्यावर कसा तोडगा काढता येईल, याबाबत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे, त्यांचे नुकसान रोखणे यावर संशोधन होणे आवश्यक आहे, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांनी व्यक्त केले.
गोळप येथे मंडळनिहाय शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्यावेळी उदय बने बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ शेतकरी मंच असणे गरजेचे आहे जेणेकरून जास्तीत जास्त संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. सर्व बँकांनी गावपातळीवर शेतकरी मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी स्वतः फक्त आंबा-काजूसह इतरही पूरक व्यवसायाकडे वळण्याकरिता प्रयत्नशील राहिले पाहिजे. यावेळी डॉ. किरण मालशे यांनी सध्या स्थितीतील शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. शिंदे यांनी शेतकऱ्यांना आंबा पिकावरील कीड व रोग यांची ओळख, त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मुकुंदराव जोशी यांनी जीआय मानांकन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सध्याच्या स्थितीत हापूस आंबा जीआय मानांकनासाठी येत असलेल्या समस्या व त्यावर त्यांची असलेली भूमिका शेतकऱ्यांसमोर मांडली. यावेळी गोळप सरपंच प्रियांका सुर्वे, मावळंगे सरपंच नम्रता बिर्जे, प्रकाश साळवी, मंगेश साळवी, सागर कासेकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 27/Dec/2025














