राजापुरात जमिनीचा मोठा घोटाळा! बोगस आधारकार्ड आणि खोट्या सह्या करून हडपली जमीन; कोल्हापूरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

राजापूर/रत्नागिरी : कोकणात जमिनींचे व्यवहार वाढले असतानाच आता फसवणुकीचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. राजापूर (Rajapur) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात चक्क बोगस आधारकार्ड (Bogus Aadhar Card) आणि खोट्या सह्यांचा वापर करून दुसऱ्याची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेळगावच्या शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून कोल्हापुरातील ५ जणांविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य फसवणुकीची घटना १९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत दुय्यम निबंधक कार्यालय, राजापूर येथे घडली होती. मात्र, या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.३२ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी उमेश दत्तु पाटील (वय ५३, रा. कोगनोळी ग्रामपंचायत जवळ, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांची राजापूर तालुक्यात जमीन आहे. आरोपींनी संगनमत करून ही जमीन हडपण्याचा कट रचला.

कोल्हापूर कनेक्शन आणि बोगस व्यवहार

मुख्य आरोपी चवगोंडा आण्णासो पाटील (रा. चिंचवाड, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याने इतर चार साथीदारांच्या मदतीने हा बनाव रचला. राजापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचे बोगस खरेदीखत (Fake Sale Deed) तयार करण्यात आले. यासाठी आरोपींनी:

फिर्यादी उमेश पाटील यांचे बोगस आधारकार्ड तयार केले.

खरेदीखतावर त्यांच्या खोट्या सह्या केल्या.

स्वतःच्या फायद्यासाठी ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली.

पाच जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी खालील ५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे: १) चवगोंडा आण्णासो पाटील (रा. चिंचवाड, करवीर, कोल्हापूर) २) फत्तेसिंह दत्तात्रय चव्हाण (वय ७५, निवृत्त, रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर) ३) श्रीमती पद्मजा प्रकाश लेंगडे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) ४) प्रशांत पाटील (रा. पाचबंगला, शहापुरी, कोल्हापूर) ५) प्रशांत पाटील यांची पत्नी (नाव माहित नाही, रा. कोल्हापूर)

गुन्हा दाखल

फिर्यादी उमेश पाटील यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी वरील पाचही आरोपींविरोधात भा.द.वि. (IPC) कलम ४२० (फसवणूक), ४६७ (बनावट दस्तऐवज बनवणे), ४६८ (फसवणुकीसाठी बनावटगिरी), ४७१ (बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे) आणि ३४ (संगनमत) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (गुन्हा रजिस्टर नंबर २४९/२०२५).

राजापूर सारख्या ठिकाणी बोगस कागदपत्रे वापरून जमिनीचे व्यवहार होत असल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आता या रॅकेटचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 27-12-2025