रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था व बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रत्नागिरी यांच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत व्यावसायिक बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना उद्योजकतेकडे प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हे प्रशिक्षण दि. ५ जानेवारी २०२६ पासून १८ दिवस निवासी स्वरूपात राबविण्यात येणार असून प्रशिक्षण काळात सहभागी महिलांना आधुनिक बेकरी उद्योगाशी संबंधित सैद्धांतिक तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये केक, ब्रेड, पेस्ट्री, कुकीज, पाव, टोस्ट, पिझ्झा, बर्गर बन, चॉकलेट आदी विविध बेकरी पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकविण्यात येणार आहे. अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार असून प्रशिक्षणार्थीना निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रशिक्षणादरम्यान केवळ उत्पादन निर्मितीपुरतेच नव्हे, तर स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही दिले जाणार आहे. यामध्ये शासकीय कर्ज व अनुदान योजना, उद्योग उभारणीची प्रक्रिया, व्यवसाय नोंदणी, FSSAI व Udyam नोंदणी, आवश्यक परवाने, खर्च-नियोजन, तसेच बाजारपेठेचे सर्वेक्षण व विपणन तंत्र याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना MCED मान्यताप्राप्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण खुल्या प्रवर्गातील (Open Category) महिलांसाठी असून अर्जदार महिला किमान ८ वी उत्तीर्ण व १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. प्रशिक्षणासाठी फक्त २० जागा उपलब्ध असल्याने प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करताना महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate), आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा पुरावा, उत्पन्न दाखला तसेच विवाहित महिलांच्या बाबतीत विवाह प्रमाणपत्र किंवा संबंधित पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
खुल्या प्रवर्गाचा उल्लेख असलेले शासकीय कागदपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. इच्छुक महिलांनी दि. ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी पूर्ण करावी. प्रशिक्षणाचे ठिकाण बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे असून अधिक माहितीसाठी ७४८८४२३३६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या, बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 27/Dec/2025














