खेड : लोटे-परशुराम एमआयडीसीमध्ये आवाशी फाटा येथील एमको पेस्टिसाइड ते एस. आर. फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर महानगर गॅस कंपनीचे ठेकेदार रस्त्यामध्येच खोदाई करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनात आले आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना तिथे त्वरित पाचारण करून काम थांबवण्याबाबतच्या सूचना लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राज आंब्रे यांनी दिली.
दरम्यान, लोटे येथील एमआयडीसीचे रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. त्यात महानगर गॅस कंपनीने गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्याला घासून खोदाई करून सगळी माती रस्त्यावर टाकलेली होती. यावर वारंवार तक्रारी करून संबंधितांना बोलवून सूचना करण्यात आल्या होत्या. रस्ते पूर्ववत दुरुस्त करून देतो असे त्यांनी सांगितले होते. परंतु त्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही होताना दिसत नाही. यापुढे महानगर कंपनीमार्फत अशा पद्धतीने काम होत असेल तर ते काम होऊ देणार नाही असे राज आंब्रे यांनी सांगितले आहे. तसेच माती टाकून बुजवलेले रस्ते त्वरित योग्य पद्धतीने दुरुस्त करावेत, असे निर्देश दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 29/Dec/2025














