खेड : कोकण मार्गावरील प्रवाशांच्या कायमस्वरूपी तक्रारी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून कोकणकन्या आणि तुतारी एक्स्प्रेसच्या आरक्षणासाठी आधार ओटीपी पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तिकीट व्यवस्थेत पारदर्शकता येईल, तसेच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या तिकीट काळाबाजारावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांना मोठी प्रवासी मागणी आहे. मात्र, अनेकवेळा आरक्षित डब्यांमध्ये विनातिकीट किंवा वेटिंग तिकीटधारक प्रवासी चढताना दिसतात. परिणामी वैध आरक्षण असलेल्या प्रवाशांना जागा मिळत नाही, वादावादी होते आणि प्रवास त्रासदायक ठरतो. ही गांभीर्याने बाब घेत रेल्वेने तांत्रिक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन नियमानुसार, कोकणकन्या व तुतारी एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षण करताना प्रवाशाच्या आधार क्रमांकावर येणारा ओटीपी पडताळणे बंधनकारक असेल. विशेषतः तत्काळ तिकीट काढताना प्रवाशाचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक राहणार आहे. यामुळे एका व्यक्तीने मोठ्या प्रमाणात तिकिटे काढणे, बनावट नावे वापरणे किंवा दलालांमार्फत तिकिटांचा साठा करणे कठीण होणार आहे.
सणासुदीच्या काळात, उन्हाळी सुट्ट्या किंवा गणेशोत्सवाच्या वेळी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळणे जवळपास अशक्य होते. रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे की आधार ओटीपी प्रणालीमुळे एकाच व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर तिकीट बुकिंग थांबेल. बनावट आयडी वापरून तिकीट काढणे कठीण होईल. दलाल व एजंटांचा हस्तक्षेप कमी होईल, खऱ्या प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी वाढेल. मात्र, प्रवाशांमध्ये अशीही चिंता आहे की ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मोबाईल क्रमांक अद्याप आधारशी लिंक नसल्याने त्यांना अडचणी येऊ शकतात. कोकण मार्गावरील प्रवासी या निर्णयाचे स्वागत करत असले तरी केवळ नियम लागू करूनच प्रश्न सुटणार नाही, असे मत व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:01 PM 29/Dec/2025














