Mahayuti | महायुतीचे चार नगराध्यक्ष स्वीकारणार आज पदभार

रत्नागिरी : रत्नागिरीच्या नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वेसह खेड, चिपळूण, राजापूर नगरपरिषदांसह लांजा, देवरूख, गुहागर नगरपंचायतींच्या नूतन नगराध्यक्षांची नावे शासन राजपत्रात समाविष्ट झाली आहेत. रत्नागिरीतील महायुतीच्या नगराध्यक्षा सुर्वे यांच्यासह खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, देवरूख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये या नगरसेवकांच्या
उपस्थितीत आपआपल्या नगर परिषदांचा कार्यभार सोमवारी हाती घेणार आहेत.

रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सकाळी १० वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दालनातील आसन ग्रहण केल्यानंतर या सर्वांचे प्रत्यक्ष लोकसेवेचे कार्य सुरू होणार आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी झाले. न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रभाग क्र. १० चे मतदान २ डिसेंबर ऎवजी २० डिसेंबर रोजी झाले. त्यामुळे मतमोजणी २१ डिसेंबर रोजी झाली. शिवसेना भाजप युतीच्या नगराध्यक्षा म्हणून शिल्पा सुर्वे विजयी झाल्या. शिवसेनेचे २३ आणि भाजपाचे ६ नगरसेवक निवडून आले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ३ नगरसेवक विजयी झाले.

शासकीय राजपत्रात सर्व नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे समाविष्ट झाली आहेत. राजपत्रात नावे समाविष्ट झाली असल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १९ (१) अन्वये घोषित केले आहे. राज्य निवडणुक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार ही राजपत्रात नावे दाखल झाल्याची घोषणा केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 29/Dec/2025