देवरुख : श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय आणि का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल आयोजित वेरवली बु. (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा २०२५ मध्ये देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पोट्रेट (व्यक्तिचित्र) हा विषय आयोजकांनी दिला होता. या व्यक्तित्वांमध्ये भारतीय खेळाडू, सिने कलाकार, नाट्य कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, राष्ट्रपुरुष, प्रसिद्ध राजकारणी व देवी-देवता यापैकी एका विषयाची निवड करायची होती.
विलास रहाटे यांनी जागतिक दर्जाचे भारतीय शिल्पकार स्व. राम सुतार यांच्या जीवनावर आधारित ३४ फूट आकारात ही आकर्षक रांगोळी साकारली. ही रांगोळी विलास रहाटे यांनी १२ तासांत पूर्ण करून यश प्राप्त केले.
विलास रहाटे यांनी आपल्या कलाकारीतून भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा स्व. राम सुतार यांनी घडविलेल्या जगप्रसिद्ध पुतळ्याची प्रतिकृती आणि स्व. राम सुतार यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तीन छबी उत्तमरीत्या साकारल्या होत्या. विलास रहाटे यांना विजेतेपदासाठी आयोजकांनी रोख रक्कम ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले. रहाटे यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 29/Dec/2025














