Mumbai-Goa Highway | संगमेश्वरात महामार्गावर ११ जानेवारीला रास्ता रोको आंदोलन

देवरुख : जून २०२५ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल, अशी वारंवार दिली जाणारी आश्वासने केवळ कागदावरच राहिली असल्याने कोकणातील नागरिक ११ जानेवारी रोजी संगमेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन छेडणार आहेत. महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. डेडलाईनवर डेडलाईन संपूनही महामार्ग पूर्ण न झाल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली कामे, निकृष्ट दर्जाचे रस्ते, अपघातांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता आता कोकणकरांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

संगमेश्वर बसस्थानकाजवळ सकाळी दहा वाजता हे आंदोलन होणार आहे. महामार्गाच्या संथ कामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले असून अनेक अपघातांमध्ये निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही ठेकेदार कंपन्या आणि संबंधित यंत्रणांकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या आंदोलनाद्वारे महामार्गाच काम तातडीने पूर्ण करावे, खोट्या डेडलाईन देणे थांबवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. या रास्तारोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कोकणकर नागरिकांना करण्यात आले आहे. जनआक्रोश समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 29/Dec/2025