चिपळूण : अपत्य होत नसल्याच्या नैराश्यातून एका २७ वर्षीय विवाहित महिलेने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयश्री विजय मोहिते (राहणार आकले तळवडेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री यांचा विवाह ०५ मार्च २०१७ रोजी विजय भगवान मोहिते यांच्याशी झाला होता. लग्नाला सात वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने त्या गेल्या काही काळापासून सतत मानसिक तणावाखाली होत्या. याच तणावातून त्यांनी २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले.
विषप्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, दादर येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे हलवण्यात आले. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:४६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली असून, २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:१८ वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 29/Dec/2025














