राजापूर : राजापुरात छुप्या पध्दतीने गोवा बनवाटीच्या दारूची होत असलेली विक्री व वाहतुक चर्चेत असताना रविवारी राजापूर पोलीसांनी शहरातील बौध्दवाडी येथे एका क्रेटा गाडीमध्ये गोवा बनवाटीची दारू भरलेले ६७ बॉक्स किंमत सुमारे १ लाख १५ हजार ९२० रूपये तर पाच लाख रूपये किमतीची क्रेटा गाडी जप्त केली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी रोहित अंबाजी इंगळे रा. राजापूर बंगलवाडी या एका संशयीत आरोपीला ताब्यात घेतलो असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलीसांनी ही धडक कारवाई केल्याने पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे. राजापूर शहर व तालुका परिसरात मोठया प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारूची वाहतुक व विक्री होत असल्याबाबत यापुर्वी अनेक तक्रारी आहेत. पोलीसांनी यापुर्वी अनेक वेळा कारवाई करूनही हे प्रकार राजरोसपणे सुरूच आहेत. राजापूर एसटी डेपो समोरही यापुर्वी पोलीसांनी अशा प्रकारे गोवा बनावटीच्या दारूची वाहतुक करणारे टेम्पो पोलीसांनी ताब्यात घेत कारवाई केली होती. मात्र तरीही हे प्रकारे सुरूच आहेत.
रविवारी अशाच प्रकारे राजापूर शाहरातील बौध्दवाडी भागात गोवा बनावटीची दारूचे बॉक्स भरलेली कार उभी असल्याची गोपनिय माहिती राजापूर पोलीसांना मिळाली होती. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, दिपज्योती पाटील यांसह पोलीस कर्मचारी अनिल केसकर, प्रथमेश वारिक, डिगंबर शेलार, पोलीस वाहन चालक हर्षद मुल्ला यांच्या पथकाने रविवारी दुपारी १ वाजता ही धडक कारवाई केली.
या कारवाईत पोलीसांनी सुमारे १ लाख १५ हजार ९२० रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू असलेले ६७बॉक्स, तसेच सुमारे पाच लाख रूपये क्रेटा कार क्रमांक MH 05EA 0661 ही गाडी असा एकूण सहा लाख पंधरा हजार ९२० रूपयांचा मुद्देमाल व एक आरोपी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाणे गु. र. न. 252/2025 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 29/Dec/2025














