तरुणाईचे नोकरीसाठी स्थलांतर कोकणला मारक : प्राचार्य डॉ. पी. जी. पवार

राजापूर : संस्कृती निर्माण व्हायला हजारो वर्षे जातात; पण त्याच संस्कृतीची विकृतीमुळे अल्पावधीतच घसरण होते. आज समाजाचे बदलत चाललेले नैतिकतेचे मापदंड संस्कृतीसाठी घातक असून, ते समाजासाठी गंभीर आहे. कोकण हा पृथ्वीवरला स्वर्ग आहे. येथील तरुणाईचे नोकरीसाठी होणारे स्थलांतर कोकणला मारक असून, आपण आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मलकापूर प्रा. एन. डी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी केले.

रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर होते.

डॉ. पवार पुढे म्हणाले, खापणे महाविद्यालयाने अशा दुर्गम भागात चालवलेला हा ज्ञानयज्ञ सर्वांना मार्गदर्शक असून या संस्थेचे अध्यक्ष मनोहर खापणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करावे लागेल. या महाविद्यालयातील तरुणाईन नोकरीऐवजी कोकणात असणाऱ्या व्यवसायाच्या संधी ओळखून त्याकडे करिअर म्हणून पाहावे. आज मोवाईलमध्ये रमणारी मुले शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मोबाईलमुळे माणसांचा एकलकोंडेपणा वाढत चालला असून, तो समाजासाठी चिंताजनक आहे. मोबाईलचा वापर तुमच्या करिअरसाठी करून तुम्ही तुमचे अपेक्षित ध्येय साध्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य विजय सावंत, चंद्रकांत लिंगायत, पोलिसपाटील महेंद्र जाधव, रायपाटणचे पोलिसपाटील महादेव नेवरेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही. निंबाळकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, अहवाल वाचन डॉ. ए. डी. पाटील, सूत्रसंचालन प्रा. एस. व्ही. निंबाळकर, तर आभार प्रदर्शन डॉ. बी. टी. दाभाडे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 29/Dec/2025