Khed : न्यू मांडवे लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ठोस पावले उचलली न गेल्यास आत्मदहनाचा निर्धार

खेड : न्यू मांडवे लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात प्रकल्पस्थळी जाहीर सभा घेण्यात आली. किंजळे तर्फे नातू, घोगरे, दहिवली, शिंगरी, पुरे, मांडवे व तळे या प्रकल्पग्रस्त गावांतील भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन व स्वागतपर भाषण किंजळे येथील रवींद्र निकम यांनी केले.

यावेळी नितीन जाधव यांनी प्रकल्पासंदर्भातील आतापर्यंतच्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती दिली व आगामी एक महिन्यात धरण प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ठोस पावले उचलली न गेल्यास आत्मदहन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

२६ जानेवारी २०२२ रोजी जल फाऊंडेशन कोकण विभाग (रजि.) च्या वतीने प्रकल्पस्थळी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या उपोषणानंतर कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी प्रकल्पाला भेट देत अडचणी लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण दुय्यम सुत्रमा तयार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रकल्पाच्या फाईलने वेगाने विविध टप्पे पार करत वित्त विभागात प्रवेश केला; मात्र गेल्या तीन वर्षांपासून ही फाईल तेथेच अडकून असल्याचे जाधव यांनी सांगितले.

वित्त विभागाकडून अद्याप कोणतेही लेखी उत्तर न मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणून २६ जानेवारी २०२६ रोजी प्रकल्पस्थळी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे नितीन जाधव यांनी जाहीर केले. या निर्णयावर आपण ठाम असून तो मागे घेणार नसल्याचेही त्यांनी केले. स्पष्ट सभेत उपस्थित भूमिपुत्रांनी धरण पूर्ण व्हावे, पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावे व वाढीव मोबदला मिळावा, अशी भूमिका मांडली. शासनाच्या पत्रव्यवहारात धरणासाठी निधीचा उल्लेख असल्याचेही काही वक्त्यांनी नमूद केले. अनेकांनी नितीन जाधव यांना पाठिंबा दर्शवित तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भूमिपुत्रांनी आत्मपरीक्षण करीत धरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कायदेशीर बाबींचे अपुरे ज्ञान व संघटनाचा अभाव असल्याचे मान्य केले. आज ही वेळ येण्यास सामूहिक निष्क्रियताही कारणीभूत असल्याची कबुली देत, ही परिस्थिती संपूर्ण विभागासाठी व महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी ठरू नये, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी कोणताही राजकीय हेतू न ठेवता प्रत्येक गावातील प्रतिनिधींमधून न्यू मांडवे धरण कोअर कमिटी स्थापन करण्यात आली. ही समिती तातडीने स्थानिक आमदार तथा मंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन प्रकल्पाचा प्रश्न गांभीर्याने मांडणार आहे.

नितीन जाधव यांनी उपस्थितांना संबोधित करत, तुमच्या हातात एक महिना आहे. या कालावधीत जे काही शक्य आहे ते करा. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, असे सांगितले. लवकरात लवकर आमदार तथा मंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्याचे, तसेच नितीन जाधव यांना आत्मदहनापासून परावृत्त करण्याची जबाबदारी कोअर कमिटीने स्वीकारण्याचे ठरवून सभा समाप्त झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:12 PM 29/Dec/2025