मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ-कुंभार्ली गावात अखेर नवीन विहिरीच्या कामास सुरुवात झाली असून, दीर्घकाळापासून सुरू असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या दूषित पाणीपुरवठा व कथित भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांनी उभारलेल्या आंदोलनाला सहा महिन्यांनंतर यश आले आहे.
२८ मे २०२५ रोजी ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ आणि महिला वर्ग यांनी पंचायत समिती मंडणगड येथे जोरदार आंदोलन करत नवीन विहिरीची ठाम मागणी केली होती. या आंदोलनाला खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष व भाजप नेते अॅड. श्री. वैभवजी खेडेकर यांनी सक्रिय पाठबळ दिले. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ आणि महिलांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश येत आज २८ डिसेंबर २०२५ रोजी नवीन विहिरीच्या कामाचे भूमिपूजन श्री. वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते पार पडले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
या उपक्रमात ग्रामस्थ मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. संतोष सीताराम कलमकर, अध्यक्ष श्री. मारुती धोंडू म्हाप्रळकर यांच्यासह श्री. रामदास म्हाप्रळकर, श्री. वासुदेव केळसकर, श्री. लहू म्हाप्रळकर यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. राकेश रामदास म्हाप्रळकर, उपाध्यक्ष श्री. सचिन सुभाष संवादकर यांच्यासह श्री. अशोक चिपळूणकर, श्री. सीताराम लंगे, श्री. चंद्रकांत केळसकर, श्री. नथुराम कलमकर, श्री. महेश संवादकर, श्री. गणेश चिपळूणकर आणि संपूर्ण महिला वर्गाने एकजुटीने प्रयत्न केले. भूमिपूजन सोहळ्यात ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत हा विजय गावकऱ्यांच्या एकतेचा, महिलांच्या सक्रिय सहभागाचा आणि सातत्यपूर्ण लढ्याचा परिणाम असल्याचे सांगितले. लवकरच गावाला स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. नवीन विहीर पूर्ण झाल्यानंतर म्हाप्रळ-कुंभार्ली गावाचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 29/Dec/2025














