चिपळूण न. प. इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट करून वापर तत्काळ बंद करण्याची मागणी : इनायत मुकादम

चिपळूण : चिपळूण नगर पालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असूनही तिचा वापर सुरूच ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर करून तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारतीचा वापर बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

१९४२ साली बांधण्यात आलेल्या या इमारतीला सुमारे ८२ वर्षांहून अधिक कालावधी झाला असून तांत्रिकदृष्ट्या या इमारतीचे आयुर्मान संपुष्टात आलेले आहे. अर्जानुसार, इमारतीच्या छताचा प्लास्टर वारंवार कोसळत असून यापूर्वीही स्लॅबचे तुकडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात गळती लागणे, छताचे थर उखडणे यामुळे ही इमारत दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे.

माजी नगरसेवक मुकादम यांनी नमूद केले आहे की, ४ मे २०२२ रोजी त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार करून प्रत्यक्ष भेटही घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र तब्बल तीन वर्षे उलटूनही नगर परिषदेकडून ना ऑडिट करण्यात आले, ना कोणतीही दुरुस्ती किंवा मजबुतीकरणाची उपाययोजना करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर नवीन लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यभार सुरू झाला असून, या इमारतीत रोज शेकडो नागरिक, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत आहेत. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होऊन तत्काळ आदेश द्यावेत, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या अपघातास जबाबदार कोण? असा थेट सवालही मुकादम यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 29/Dec/2025