Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा

रत्नागिरी : नाताळ सण आणि जोडून आलेल्या सार्वजनिक सुट्टयांमुळे मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे महामार्गावर खासगी आणि सार्वजनिक सेवेंच्या वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी, या महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

सुट्टयांचे दिवस निसर्गरम्य वातावरणात घालवण्यासाठी हजारो पर्यटक जिल्ह्यातील वेगवेगळया ठिकाणी जात आहेत. या पर्यटकांच्या वाहनांसह सार्वजनिक सेवेंची वाहने मोठ्या प्रमाणात महामार्गावरुन येत जात आहेत. पर्यटकांचे आगमन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यांना रहाण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जावून रूम उपलब्ध आहेत का याची माहिती घ्यावी लागत आहे. मात्र सर्व लॉजेस फुल्ल आहेत. ज्या पर्यटकांना हॉटेलमध्ये रुम मिळाले नाही ते आपापल्या वाहनांमध्येच राहून रात्र काढत आहेत. वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

जिल्ह्यातील दाभोळ, गुहागर, हेदवी, गणपतीपुळे, आरे-वारे, रत्नागिरी, काळबादेवी, पावस, कशेळी, जैतापूर आदी ठिकाणी पर्यटकांचा ओघ आहे. त्यामुळे त्या-त्या ठिकाणचे समुद्र किनारेही पर्यटकांच्या गर्दीन फुलून गेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 29/Dec/2025