चिपळूण : चिपळूण शहराला वीजपुरवठा करण्यासाठी चिपळूण शहरात दोन उपकेंद्र महावितरणने उभी केली आहेत. त्यापैकी मुरादपूर या ठिकाणी उपकेंद्र असून त्यामधून चिपळूण शहरातील काही भागाला वीजपुरवठा केला जातो. परंतु मुरादपूर उपकेंद्रात सतत बिघाड होत आहे. त्यामुळे मुरादपूर उपकेंद्र आऊटडोअर करण्याच्या सूचना आ. शेखर निकम यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता (रत्नागिरी) यांना दिल्या आहेत.
चिपळूण शहराला मुरादपूर उपकेंद्रातून होणाऱ्या वीजपुरवठ्यात वारंवार अडथळे येत आहेत. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने चिपळूण शहरातील व्यापारी व घरगुती वापर करणारे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. यावावत अनेकवेळा महावितरण कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या. यानंतर तात्पुरती दुरुस्ती केली जात होती. मात्र, वीजपुरवठा अखंडितपणे मिळत नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत होते.
याबाबत मतदारसंघांचे आमदार शेखर निकम यांनी महावितरणचे अधिकारी, नागरिक आणि शहरातील व्यापारी यांची एकत्रित बैठक लावून हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार मुरादपूर उपकेंद्र हे इनडोअर असल्याने व नदीकिनारी असल्याने वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणामध्ये बाष्प पकडले जाते. पावसाळा आणि हिवाळ्यातील महिन्यांमध्ये बाष्पामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. यामुळे आ. शेखर निकम यांनी अधीक्षक अभियंता, रत्नागिरी यांना मुरादपूर उपकेंद्र हे आऊटडोअर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महावितरण अधिकाऱ्यांनी सुमारे ५० लाखांचे अंदाजपत्रक बनवले असून ते मंजुरीकरिता वरिष्ठ कार्यालयास सादर केले आहे. हे काम तातडीने झाल्यास चिपळूणवासीयांना अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 29/Dec/2025














