गुहागर : शहरातील वरचापाट परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर भरदुपारी दोन कुटुंबांतील ४ जण पाण्यात उतरले होते. त्यापैकी ४२ वर्षीय अमूल मुथ्था यांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दोन मुले आणि एका महिलेला गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक आणि श्री समर्थ वॉटर स्पोर्टस्च्या दोन कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना दि. २७ डिसेंबरला दुपारी ११.४५ ते १२.१५ च्या दरम्यान घडली.
सध्या नाताळची सुट्टी असल्याने गुहागरमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी आहे. यापैकी अनेक पर्यटकांसाठी गुहागरचा समुद्र हा आकर्षणाचा मुख्य बिंदू ठरला आहे. या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. मुंबई पवई-चांदेराई येथे राहणारे कांचन विजयकुमार मुथ्था, अमूल विजयकुमार मुथ्था, सौ. श्वेता अमुल मुथ्था आणि विहान अमुल मुथ्था हे कुटुंब २४ डिसेंबरला सायंकाळी गुहागरमध्ये दाखल झाले. अमूल मुथ्था व श्वेता मुथ्था सॉफ्टवेअर इंजिनिअर असून दोघेही मुंबई-पवई येथे नोकरी करतात. नाताळची आठ दिवसांची सुट्टी निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी त्यांनी गुहागरजवळ जोशी होम स्टेमध्ये मुक्काम केला होता. सौ. श्वेता मुथ्था यांची पिंपळे सौदागर, पुणे येथे रहाणारी बहिण सौ. सोनल सिंघवी ही पती पंकज सिंघवी आणि मुलगी सिया सिंघवी यांच्यासह २६ डिसेंबरला गुहागरला आली. सिंघवी कुटुंब शहरातील राजगड हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. २६ डिसेंबरला रात्री सिंघवी व मुथ्था कुटुंब एकत्र आले त्यावेळी त्यांनी २७ डिसेंबरला दुपारी समुद्रावर पोहायला जाण्याचे ठरविले.
त्याप्रमाणे मुथ्था कुटुंब आणि सिंघवी कुटुंब २७ डिसेंबरला दुपारी ११.४५ च्या दरम्यान हॉटेल राजगडच्या मागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर गेले. पंकज सिंघवी आणि सोनल सिंघवी समुद्रकिनाऱ्यावर वाळुत थांबले होते. तर अमुल मुथ्था (वय ४२), श्वेता मुथ्था (वय ४२), विहान मुथ्था (वय १३) आणि सिया सिंघवी (वय १९) हे चौघे समुद्रात पोहायला गेले. पाण्यात खेळता खेळता अमूल मुथ्था खोल पाण्यात गेले. त्यांनी पुन्हा किनारा गाठण्यासाठी पोहायला सुरवात केली. मात्र त्यांची दमछाक झाली. अन्य तिघे देखील अमुल मुथ्था यांच्यापासून थोड्या अंतरावर होते. याच काळात पवारसाखरी येथील अक्षय पवार सहज फिरायला समुद्रावर आले होते. त्यांनी पर्यटकांची ओरड ऐकली आणि सोहम सातार्डेकरला फोन करुन मदतीसाठी बोलावले. सोहमने नगरपंचायतीचा कर्मचारी आशिष सांगळे याला फोन केला.
आशिष आणि सोहम समुद्रावर येत असतानाच त्यांनी जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि श्री समर्थ वॉटर स्पोटर्सचे मालक उमेश भोसले यांना बोलाविले. प्रदेश तांडेल आणि श्री समर्थ वॉटर स्पोर्टस्मधील कर्मचारी मुजाहुद्दीन मिरकर व सद्दाम बागकर असे तिघेजण जेट स्की घेवून समुद्रातून हॉटेल राजगडच्या मागे आले. त्यांनी बेशुध्दावस्थेत असलेल्या अमुल मुथ्था यांच्यासह श्वेता मुथ्था, विहान मुथ्था आणि सिया मुथ्था यांना समुद्रकिनाऱ्यावर आणले. जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि आशिष सांगळे यांनी अमुल मुथ्थांना सीपीआरची ट्रीटमेंट दिली. बेशुद्ध अवस्थेतील अमुल मुथ्था यांना तत्काळ वाहनाने ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अमुल मुथ्था यांना मृत घोषित केले तर अन्य तिघाजणांना वाचविण्यात यश आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 29/Dec/2025














