Khed Nagar Parishad : खेडच्या नगराध्यक्षपदी माधवी बुटाला ढोल-ताशांच्या गजरात विराजमान

खेड : ढोल-ताशांच्या गजरात माधवी राजेश बुटाला आज (सोमवारी) खेडच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा झाला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, दुबईचे उद्योजक बशीर हजवाणी, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी सभापती अरुण कदम, शहरप्रमुख कुंदन सातपुते, शिवसेनेचे निवडणूक प्रमुख संजय मोदी, माजी नगरसेवक मिनार चिखले, राजेश बुटाला, मुख्याधिकारी महादेव रोडगे, महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्यासह नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. सकाळी ११ वाजल्यापासून नगरपालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ११.३० वा. माधवी बुटाला पालिकेत आल्या. सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

त्यानंतर श्रेया कदम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सर्व नगरसेवकांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना श्रेया कदम यांनी, खेड शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम देतील आणि शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माधवी ताई आपण जोमाने काम सुरू करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्या म्हणाल्या. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर म्हणाले की, नगराध्यक्ष पदाची खुर्ची काटेरी असते. त्या खुर्चीचा उपयोग आपण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करावा. महायुतीचे सरकार आपल्याला नेहमी सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले.

श्रीमती बुटाला यांचे अभिनंदन करण्यासाठी शहरातील सर्व स्तरातील नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्षा वैशाली कवळे, गौरी पुळेकर, रईसा मुजावर, उर्मिला पाटणे-शेट्ये या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 30/Dec/2025