यशाच्या शिखरावर जाण्यासाठी प्रयत्नांच्या पायऱ्या चढल्या पाहिजेत : विशाल चितळे

चिपळूण : विद्यार्थी जीवनात स्वप्नं पाहिली पाहिजेत; ती स्वप्ने वास्तवात उतरवण्याची धडपड केली पाहिजे. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी प्रयत्नांच्या पायऱ्या चढल्या पाहिजेत, असे मत डीबीजे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. विशाल चितळे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री सौरभ हिर्लेकर, उपाध्यक्ष श्री प्रकाश मारूती जोशी, चेअरमन श्री मंगेश तांबे, सचिव श्री अतुल चितळे, प्राचार्य डॉ. माधव बापट वार्षिक स्नेहसंमेलन समिती प्रमुख अनिल पुनवतकर आदी मान्यवर उपस्थित होते. येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाचे ‘उडान युवा मनाची २०२५ महोत्सव संपन्न होत आहे. त्यामध्ये वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभाला श्री. सौरभ हिर्लेकर (सिनिअर सेल्सफोर्स डेव्हऑप्स आर्किटेक्ट पर्सिस्टंट सॉफ्टवेअर, पुणे)

श्री. विशाल चितळे (प्रॉडक्ट ओनर आणि सोल्युशन्स आडिटेक्ट,) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी केले. महाविद्यालयाला स्वायत्तेचा दर्जा प्राप्त झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातले आयएसओ मानांकन देखील प्राप्त झाले आहे. ही अभिनंदनीय बाब आहे असे मत व्यक्त करून महाविद्यालयात नव्याने सुरू केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. तर संस्थेचे सचिव श्री अतुल चितळे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थी जीवनात अभ्यासाला पर्याय नाही असे मत व्यक्त केले.

प्रा. अनिल पुनवतकर यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रमुख पाहुणे श्री. विशाल चितळे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांच्या यशाच्या वाटचालीत प्रामाणिकपणा, मेहनत, आदर आणि समाजाला देण्याची वृत्ती ही चार मूलतत्वे सांगितली. जग बदलत आहे. याबद्दलचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. समाज आपले व्यक्तिमत्व घडवत असते. त्याची आपण उतराई केली पाहिजे असे मत व्यक्त केले. तर दुसरे पाहुणे श्री सौरभ हिर्लेकर यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये तुमचं यश हे परिस्थितीवर अवलंबून नसून ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. लोक चांगले वाईट बोलत असतात त्यावेळी दुर्लक्ष करा पण त्यांचं म्हणणं लक्षात घ्या. स्वतःला वेळ द्या; जीवनात शॉर्टकट काही नसतं. टेक्नॉलॉजी केवळ साधन आहे. तुमच्या बुद्धिमत्तेला पर्याय नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

कनिष्ठ महाविद्यालयीन शैक्षणिक पारितोषिकाचे यादी वाचन प्रा. शुभांगी इंगळे तर वरिष्ठ महाविद्यालयीन पारितोषिकाचे वाचन प्रा. डॉ. ऋचा खवणेकर यांनी केले. ओलंपियाड व टेल प्रोग्राम पारितोषिक यादी वाचन प्रा.सौ. प्राजक्ता चितळे, मानसशात्र व इतिहास विभाग प्रा. ऐश्वर्या माळवे, डॉ. ज्ञानोबा कदम, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी गौरव व डी. बी. जे. गौरव यांचे वाचन प्रा. सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी केल. या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार श्री. संजीव खरे, नियामक समिती सदस्य श्री. अविनाश जोशी, श्री. नयनीश गुढेकर, श्री. निलेश भुरण, बक्षीस पात्र विद्यार्थी, पालक, पत्रकार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कोंडीराम सावरे व प्रा. श्वेता चितळे यांनी केले तर आभार कु. श्रद्धा केतकर हिने मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 30/Dec/2025