राजापूर शहरातील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानची ३ जानेवारीला ‘शिवस्मरण यात्रा’

राजापूर : शहरातील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानची गडकोट मोहीम म्हणजेच “शिवस्मरण यात्रा” असून यावेळी विश्वविख्यात प्रतापगड याठिकाणी ती आयोजित करण्यात आली आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७वाजता शिवकालिन वाटेने ही यात्रा असणार आहे.

या मोहिमेदरम्यान जावळीच्या खो-यातील भोरप्याच्या डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अभेद्य गडदुर्ग साकारला तो प्रतापगड आणि गडावरील महत्वाची ठिकाणे व मंदिरे पहाण्यात येणार आहेत. ही मोहीम प्रतापगडाच्या पायथ्यापासून सुरुवात न होता शिवरायांनी ज्या घाट वाटेने उतरून चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव केला आणि जावळी स्वराज्यात आणली त्या शिवकालिन वाटेने व स्वराज्यावर चालून आलेला अफजलखान ज्या वाटेने प्रतापगडाच्या ठिकाणी आला त्या ऐतिहासिक वाटेने म्हणजेच रडतोंडीच्या घाट वाटेने, जावळीच्या खोऱ्यातील निबीड अरण्यातून, पारगावातून, निसणीच्या शिवकालिन वाटेने गडावरती जाणार आहे.

नेहमीच्या गडाच्या पायथ्यापासून गडावरती न जाता वाईवरुन अफजलखानाला गडाच्या पायथ्याशी येण्यासाठी शिवरायांनी जी वाट तयार करुन घेतली अशी इतिहासात नोंद आहे अशा वाटेने ही मोहीम निश्चित करण्यात आली आहे. ही मोहीम शिवछत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला अंगाखांद्यावरती मिरवणाऱ्या थोर प्रतापगडावर असणार आहे. ही शिवस्मरण यात्रा म्हणजे सहल नसून रयतेचे रक्षण करणा-या स्वराज्यातील वैभवाचे आणि छत्रपती शिवरायांचे स्वरुप आहे. सर्वसामान्य दुर्गप्रेमींना आई तुळजाभवानीच्या कृपेने, प्रतापगडावरील शिवछत्रपतींचा शिवप्रताप व रणझुंजार मावळ्यांचा रणसंग्राम अनुभवण्यासाठी, या ऐतिहासिक युध्दभूमीची डोळस भटकंती करण्यासाठी या गडकोट मोहिमेचे आयोजन केले आहे.

ही मोहीम अफजलखानाने ज्या वाटेने जावळीच्या खो-यात प्रवेश केला त्या प्रतापगडावरती जाणारी असणार आहे. या वाटेवरुनच स्थापत्य अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना याची देही याची डोळा पहाता येणार आहे. तेव्हा या सुवर्णसंधीचा, ऐतिहासिक दुर्गभ्रमंतीचा दुर्गप्रमींनी अवश्य लाभ घ्यावा, असे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 30/Dec/2025