Chiplun : सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय परसबाग

अडरे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात सहभाग नोंदवत शाळा परिसरात सेंद्रिय परसबागेची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात ताज्या व पौष्टिक भाज्यांचा समावेश व्हावा, तसेच परसबाग विकासाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

श्रमप्रतिष्ठा व विद्यार्थ्यांचे मातीशी नाते या मूल्यांवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. जमिनीचे सपाटीकरण, मशागत, सरी-वरंबे व गादीवाफे तयार करणे, रोपांची लागवड, सेंद्रिय खतांचा वापर, रोपांचे संवर्धन व संरक्षणासाठी हिरव्या जाळीदार कुंपणाची उभारणी अशी सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली. परसबागेत सरी-वरंब्यावर वांगी, भेंडी, मिरची, टोमॅटो, गवारी आदी फळभाज्या तर गादीवाफ्यांवर मुळा, मेथी, कोथिंबीर तसेच दोडका, काकडी, कारले यासारख्या वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 30/Dec/2025