रत्नागिरी : सन २०२७ पर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यात २२ कुष्ठरुग्ण आढळले.
या अभियानात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी मिळून एकूण सुमारे १४,९३,५४८ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ८,४४४ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी अंतिम निदान झालेले २२ कुष्ठरुग्ण आढळले असून, त्यांच्यावर बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती कुष्ठरोग विभागाचे प्रभारी सहायक संचालक डॉ. परवेज पटेल यांनी दिली आहे. ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मोहीम जरी संपली असली तरी ही तपासणी सर्व आरोग्य केंद्रांत वर्षभर सुरू असणार आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 30/Dec/2025














