रत्नागिरीत आज गो सेवा संघातर्फे गणेश पूजन आणि गोवत्स पूजन सोहळा

रत्नागिरी : वसुबारस निमित्ताने सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता चंपक मैदान, रत्नागिरी येथील गोशाळेमध्ये गो सेवा संघ रत्नागिरीतर्फे गणेश पूजन व गोवत्स पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

गोमातेचे महत्त्व आणि गो सेवा संघाचे कार्य

हिंदू धर्मात गोमातेला अत्यंत महत्त्व आहे. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या पाच कामधेनूंनी मानवाचे जीवन सुखमय करण्यासाठी धरतीवर अवतरण केले. गोमातेची सेवा ही ईश्वर सेवा मानली गेली आहे. श्रीकृष्णांनी गोपाल हे नाम धारण करून हेच संदेश दिला. गो सेवा संघाने या भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून सेवा, संवर्धन, संगोपन आणि संरक्षणाच्या चार नीतींवर आधारित कार्य सुरू ठेवले आहे.

वसुबारस पूजन सोहळ्याचे आयोजन

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोवत्स पूजनाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वसुबारस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही गोमाता निसर्ग व मानवी जीवनासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. या पूजन सोहळ्यात सहभागी होऊन हिंदू बांधवांना गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळावी, असा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. गो सेवा संघाने सर्व भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 28-10-2024