खेड : खेड तालुक्यातील वेरळ परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक चालकावर व त्याच्या भावावर लोखंडी रॉडने हल्ला करून मारहाण केल्याची गंभीर घटना मंगळवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहम किशोर मयेकर (२६, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. चिवेली करंबेळीवाडी, ता. चिपळूण) हे व त्यांचा भाऊ ओंकार किशोर मयेकर हे सर्व्हिस रोडवर ट्रक उभा करून गाडीची तपासणी करत असताना आरोपी शुभम संतोष जाधव (२७, रा. भरणेनाका, ता. खेड) व ऋत्विक उत्तम चव्हाण (२३, रा. सवेणी, कातळ माळ, ता. खेड) यांनी, तुम्ही आम्हाला गाडीखाली मारले असते असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.
यानंतर आरोपींनी लोखंडी रॉडने फिर्यादी सोहम मयेकर तसेच त्यांचा भाऊ ओंकार मयेकर, किशोर मयेकर व विक्रम खांडेकर यांना हातावर व पायावर मारहाण करून दुखापत केली. तसेच पोलिसांसमोरही मारहाण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींनी रॉडने ट्रकच्या काचा फोडून वाहनाचेही नुकसान केले. या घटनेत सोहम किशोर मयेकर हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 31/Dec/2025














