चिपळूण : खेंड येथील एका विवाहित महिलेची कांदा इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाकरिता लाखो रुपये गुंतवणुकीचे आमिष दाखवून चिपळुणातील रईस महंमद अलवी यांनी फसवणूक केल्याची तक्रार दि. २६ रोजी रात्री चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ही तक्रार संबंधित महिलेने पोलिसांत दिली आहे.
याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात नमूद केलेल्या फिर्यादीनुसार, रईस अलवी यांनी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत खेंड येथील सोमसुंदर अपार्टमेंटमधील एका महिलेला भाजीपाला, कांदा इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसाय करण्यासाठी सुमारे १३ लाख १९ हजार रूपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. यातून दुप्पट फायदा होईल, असे आमिष दाखवत तक्रारदार महिलेकडून वेळोवेळी पैसे गुंतवणुकीकरिता घेतले. त्यानंतर फिर्यादी महिलेने रईस अलवी यांच्याकडे गुंतवणूक केलेल्या पैशाकरिता मागणी करण्यास सुरुवात केली. मात्र, वारंवार मागणी करूनही अलवी यांनी तक्रारदार महिलेला उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे या महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रईस अलवी यांच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 28/Oct/2024














