Ratnagiri : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात ‘हर घर जल’ योजनेचे ४० टक्केच काम पूर्ण

रत्नागिरी : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात ‘हर घर जल’ पोहचवण्यासाठी वेगाने कामे सुरु असून गावागावातील प्रत्येक घरात नळ जोडणीची कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील १४३२ योजनांपैकी ५७२ योजनापूर्ण झाल्या असून ४०.०६ टक्के काम झाले आहे. साडेसहाशे योजनांची कामे ५० टक्क्यांहून अधिक झाली असून आतापर्यंत ६०८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पुरेसे पाणी मिळेल यासाठी जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली असून केंद्र व राज्य शासनाने यात प्रत्येकी ५० टक्के सहभाग उचलला आहे. यामध्ये पिण्याचे पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, नवीन स्त्रोत घेणे, अस्तित्वातील योजनांना सुधारात्मक पुर्नजोंडणी करुन प्रत्येक घरात नळजोडणीला मुबलक पाणी त्यामुळे मिळण्याच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात आली आहे.

जिल्ह्यात सन २१-२२ व २२-२३ सालात १४३२ योजनांना सुमारे ११५२.८८ कोटीच्या निधीला मंजूर देण्यात आली होती. त्यातील ५७२ योजना पूर्ण झाल्या आहेत. यात ३१३ योजनांची कामे ७५ टक्केहून अधिक झाली आहेत. ३२६ योजनांची कामे ५० टक्केहून अधिकझाली आहे. ५४ योजनांची कामे २५ टक्क्याहून कमी झाली असून १५० योजनांची कामे प्रगतीपथावर असून २५ टक्क्याहून अधिक झाली आहेत.

या योजनांवर आतापर्यंत ६०८.४६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या योजनेमुळे ५७२ योजनांची कामे पूर्ण झाली असून ५५९ गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या नोंदीनुसार ही योजना जिल्ह्यातील ४ लाख ४८ हजार १६१ कुटुंबापैकी ३ लाख ८७हजार ९९१ कुटूंबांकडे पोहचली आहे. कुटुंबांकडे नळ जोडणीची टक्केवारी ८६.५७ टक्के इतकी आहे. सन २०२६पर्यंत ग्रामीण भागात सर्व कुटुंबांना जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित व पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्याची केंद्र शासनाची संकल्पना आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 31/Dec/2025