Ratnagiri : चाफे-मालगुंड रस्ता रुंदीकरणाची मागणी

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील चाफे, निवेंडी, मालगुंड रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी निवेंडी गावातील प्रसिद्ध आंबा बागायतदार उल्हास पिंपुटकर यांनी केली आहे. याबाबत माहिती देताना पिंपुटकर यांनी सांगितले की, जयगड ते रत्नागिरी रोडला जोडणारा मालगुंड ते निवेंडी रत्नागिरी असा रस्ता निसर्गरम्य निवेंडी गावातून जातो. शंभर वर्षांपूर्वीचा हा रस्ता असूनसुद्धा आजही गाव नकाशावर नाही. या रस्त्याचे पाच वर्षात दोनदा डांबरीकरण झाले. हा रस्ता मालगुंड, गणपतीपुळे, वरवडे, जयगडपर्यंत जोडला जातो. तसेच या रस्त्याला नेवरे, धामणसे, गणपतीपुळे, मालगुंड, कळझोंडी, खंडाळा पोटरस्ते जोडलेले आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे.

मात्र हा रस्ता अरुंद असून मोठी वाहने दुसऱ्या वाहनाच्या बाजूने नेताना पुन्हा मोठी अडचण होते. त्यामुळे या राज्यात लहान लहान अपघात होत असतात. निवेंडी गावात मोठ्या प्रमाणात आंबा, काजू बागायती शेती आहे. येथील शेतकरी मजुरांची ने-आण, शेती कामाचे साहित्य, फवारणी यासाठी वाहनांचा वापर करतात. त्यांनाही अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागते. चाफे-गणपतीपुळे रस्ता हा निवेंडी गावाचे एका बाजूने सांबरेवाडी मार्गे जातो. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती ही निवेंडी मार्गे गणपतीपुळे अशी असते. हा मार्ग सुरक्षित असून निर्ससौंदर्य पहात लोकवस्तीतून जाणे हिताचे मानतात. या कारणाने निवेंडी रस्त्याचे रुंदीकरण झाले तर निश्चितपणे पर्यटकांची वर्दळ वाढेल. शेती व्यवसाय वाढतील. आंबा काजू पर्यटकांना थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खरेदी करता येईल. गावचा विकास आपोआप होईल मुंबई शहरात जाणारी तरुण पिढी गावात थांबेल. या सगळ्या बाबींचा विचार करून निवेंडी रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे, असे पिंपुटकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 31/Dec/2025