दापोलीत पर्यटनाचा आनंद झाला असता ‘जीवघेणा’! हॉटेलच्या रूमचे छत कोसळून मुंबईचे दाम्पत्य जखमी; ‘चिरा मिडोस’च्या मालकावर गुन्हा

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत (Dapoli Tourism) पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून आलेल्या एका कुटुंबावर हॉटेलच्या रूमचे छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे घडलेल्या या घटनेत पती-पत्नी जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. याप्रकरणी हॉटेल ‘चिरा मिडोस’च्या (Hotel Chira Meadows) मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मुंबईतील मुलुंड (Mulund, Mumbai) येथील विकास तिवारी (वय ४८) हे आपल्या पत्नी साधना तिवारी आणि मुलासह सुट्ट्या घालवण्यासाठी दापोलीला आले होते. त्यांनी दापोली तालुक्यातील जालगाव (Jalgaon) येथील ‘हॉटेल चिरा मिडोस’ मध्ये रूम नंबर १०६ बुक केली होती. ३० डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२.२० (००.२०) वाजण्याच्या सुमारास तिवारी कुटुंब रूममध्ये असताना अचानक छताचा मोठा भाग (Plaster/Slab) खाली कोसळला. हे छत थेट विकास तिवारी, त्यांची पत्नी आणि मुलाच्या अंगावर पडले. या घटनेत विकास तिवारी आणि त्यांची पत्नी साधना तिवारी (वय ४५) यांना दुखापत झाली आहे.

हॉटेल मालकाचा निष्काळजीपणा भोवला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलचे मालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांना रूमचे छत मोडकळीस आल्याची आणि ते पडू शकते याची पूर्णपणे जाणीव होती. तरीही पैशाच्या लोभापोटी आणि पर्यटकांच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी ही धोकादायक रूम फिर्यादींना भाड्याने दिली. तसेच, हॉटेलच्या बांधकाम कॉन्ट्रॅक्टरने (नाव गाव माहित नाही) छताचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे हा अपघात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल

फिर्यादी विकास तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी (Dapoli Police) हॉटेल मालक डॉ. राजेंद्र जगदाळे आणि अज्ञात बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम १२५(अ) (दुसऱ्याचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य) आणि ३(५) (संगनमत) अन्वये गुन्हा दाखल केला आहे (गुन्हा रजिस्टर नंबर २४६/२०२५). पर्यटकांनी गजबजलेल्या दापोलीत हॉटेलमधील अशा बेजबाबदार कारभारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 31-12-2025