देवरुखमध्ये ‘बँक ऑफ इंडिया’चे सील तोडून थकबाकीदाराची घरात घुसखोरी! १८ लाखांचे कर्ज बुडवणाऱ्या मुंबईच्या तरुणावर गुन्हा दाखल

देवरुख/संगमेश्वर : बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी कायदेशीररीत्या जप्त केलेल्या घराचे कुलूप आणि सील तोडून आत बेकायदेशीर प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार देवरुख (Devrukh) शहरात उघडकीस आला आहे. ‘बँक ऑफ इंडिया’ने (Bank of India) ताब्यात घेतलेल्या मिळकतीचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी कर्जदाराने थेट कायद्याचे उल्लंघन केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबईत राहणाऱ्या कर्जदारावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश शिरीष पवार (वय ३५, रा. १२, चिंचोली, अमर सी.एच.एस., मालाड, मुंबई) याने देवरुख येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून १८,२५,०००/- रुपये (अठरा लाख पंचवीस हजार) कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्याने देवरुख नगरपंचायतीच्या हद्दीतील घर नंबर ४४९ (सर्व्हे नं. ४५४, हिस्सा क्र. १, क्षेत्र ३०० चौ.मी.) ही मिळकत बँकेकडे तारण ठेवली होती. मात्र, आरोपीने कर्जाची परतफेड न केल्याने ३१ मार्च २०२१ रोजी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्याचे खाते थकीत (NPA) झाले होते. यानंतर बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सिक्युरिटायझेशन ॲक्ट (SARFAESI Act) अंतर्गत कारवाई सुरू केली.

सिल तोडून आत प्रवेश

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, १२ एप्रिल २०२४ रोजी देवरुख तहसीलदारांनी संबंधित घराचा प्रत्यक्ष ताबा बँकेला दिला होता. बँकेने घराला कुलूप लावून सील केले होते. मात्र, १३ एप्रिल २०२४ ते १९ मे २०२४ या कालावधीत आरोपीने बँकेच्या संमतीशिवाय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत घराच्या दरवाज्याचे कुलूप आणि सील तोडले. त्याने केवळ सीलच तोडले नाही, तर बँकेच्या ताब्यात असलेल्या या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिथे अतिक्रमण केले. तसेच तिथे कोणीतरी अनोळखी व्यक्ती राहत असल्याचे निदर्शनास आले. बँक व्यवस्थापकांची तक्रार ही बाब लक्षात आल्यानंतर बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक राजेशकुमार रामबदनसिंह (वय ४२, आंचलिक कार्यालय, रत्नागिरी) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेतली.

गुन्हा दाखल

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रथमेश पवार याच्या विरोधात खालील कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे (गुन्हा रजिस्टर नंबर १४६/२०२५):

भारतीय दंड संहिता (IPC): कलम ४२७ (नुकसान करणे), १८८ (लोकसेवकाच्या आदेशाचा अवमान), ४४७ (गुन्हेगारी अतिक्रमण), ४४८ (घरात घुसखोरी).

सुरक्षा आणि आर्थिक मालमत्ता कायदा २००२ (SARFAESI Act): कलम २९.

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेत घुसखोरी करण्याचा हा प्रकार गंभीर असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 31-12-2025