रत्नागिरी एमआयडीसीत पैशाच्या वादातून ‘फ्री-स्टाईल’ हाणामारी! किया शोरूमसमोर दोन गटात तुंबळ राडा; स्टील रॉडने फोडले डोके

◼️ एकाच घटनेत परस्परविरोधी गुन्हे दाखल; पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद विकोपाला, तिघांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसी (Ratnagiri MIDC) परिसरातील किया शोरूमसमोर (Kia Showroom) मंगळवारी दुपारी पैशाच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. भररस्त्यात झालेल्या या ‘फ्री-स्टाईल’ हाणामारीत स्टील रॉडचा वापर करण्यात आल्याने तरुणाचे डोके फुटले असून रक्तपात झाला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात (Ratnagiri Rural Police) दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या असून, परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमकी घटना काय?

ही घटना ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० वाजेच्या दरम्यान घडली. मूळ वाद हा कामगार विनोद मल्लाप्पा मदकवी आणि ऋतिक चंद्रकांत वेदरे यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून होता. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गट जमले होते, मात्र प्रकरण मिटण्याऐवजी अधिकच चिघळले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

तक्रार क्र. १ : फिर्यादी सहेल शौकत याहू
पहिल्या गुन्ह्यात (गु.र.नं. २२८/२०२५) फिर्यादी सहेल शौकत याहू (वय २८, रा. सना अपार्टमेन्ट, जेल रोड, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा कामगार विनोद मदकवी आणि आरोपी ऋतिक वेदरे यांचा पैशावरून वाद झाला होता. हा वाद मिटवून सहेल आणि त्यांचे सहकारी निघून जात असताना, आरोपींनी विनोदचा पाठलाग केला आणि त्याला मारू लागले. हे भांडण सोडवण्यासाठी सहेल यांचा भाऊ शौद शौकत याहू मध्ये पडले असता, आरोपी मज्जमील अजीज पडवेकर याने स्टीलच्या रॉडने शौद यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच सहेल आणि त्यांच्यासोबत असलेले करीम तांबोळी यांना शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी (गट १): १) मज्जमील अजीज पडवेकर, २) ऋतिक चंद्रकांत वेदरे.

तक्रार क्र. २ : फिर्यादी मज्जमील अजीज पडवेकर
दुसऱ्या गुन्ह्यात (गु.र.नं. २२९/२०२५) फिर्यादी मज्जमील अजीज पडवेकर (रा. धनजीनाका, बैलबाग, रत्नागिरी) यांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मित्र ऋतिक वेदरे आणि विनोद मदकवी यांच्यात पैशावरून वाद सुरू होता. या वादातून आरोपींनी स्टीलच्या रॉडने ऋतिक वेदरे याला मारहाण केली. तसेच फिर्यादी मज्जमील यांनाही हाताच्या थापटाने मारहाण करून शिविगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली.

आरोपी (गट २): १) सुहेल शौकत याहू, २) शौद शौकत याहू, ३) करीम तांबोळी (रा. शिरगाव).

पोलिसांची कारवाई

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीनुसार भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत), ११५(२) (मारहाण), ३५२ (शांतता भंग), ३५१(२) (धमकी) आणि ३(५) (संगनमत) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. एमआयडीसी सारख्या गजबजलेल्या भागात झालेल्या या राड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:49 31-12-2025