माखजन : ‘आत्मविश्वास आणि मेहनत ही यशाची खरी सूत्रे आहेत,’ असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे माजी क्षेत्रीय अधिकारी मुकुंद खांडेकर यांनी केले. माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल, पी. आर. नामजोशी कनिष्ठ महाविद्यालय आणि इंग्लिश मीडियम स्कूल सरंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते.
या सोहळ्यात श्री. संतोष कुलकर्णी यांनी संकलित केलेल्या ‘गुरुकुल पूरक उपक्रम’ या विशेष पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वर्षभरात शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक महादेव परब यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा प्रास्ताविकातून मांडला. स्नेहसंमेलनाच्या सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, ओडिसा नृत्य आणि देशभक्तीपर गीतांवर बहारदार सादरीकरण केले. विनोदी नाटिकांनी उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडवले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष किशोरकुमार साठे, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सचिव श्रीकांत फाटक, सहसचिव दीपक शिगवण, संचालक सुभाष सहस्त्रबुद्धे, इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत, आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील दिंडे व ऋषिकेश लोध यांनी तर आभार प्रदर्शन घाडगे सर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 31/Dec/2025














