खेडमध्ये ८ फेब्रुवारीला विद्रोही कवी साहित्य संमेलनाचे आयोजन

खेड : खेड कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने कोकणात प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या कोकण विभागीय विद्रोही कवी साहित्य संमेलन २०२६ च्या नियोजनासाठी आयोजित बैठक नुकतीच खेड येथे पार पडली.

या बैठकीस महाराष्ट्र राज्य विद्रोही सांस्कृतिक चळवळ अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संघटक किशोर ढमाले (पुणे), राज्य उपाध्यक्ष प्रा. विलास बुवा (पुणे), राज्य सदस्य अॅड. सुदीप कांबळे (सिंधुदुर्ग), राज्य अशोक मोरे (खालापूर रायगड), प्रा. वामन वळवी सदस्य (गडचिरोली), डॉ. आप्पाराव चव्हाण (नंदुरबार) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत संमेलनाचे स्वरूप, उद्दिष्टे, आयोजनाची रूपरेषा, विविध समित्यांची रचना तसेच कोकणातील साहित्यिक, कवी व सामाजिक कार्यकर्त्यांचा व्यापक सहभाग कसा वाढवता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. माता रमाई जयंतीनिमित्त दापोली तालुक्यातील वणंद येथून मशाल मिरवणूक, रायगड आणि क्रांतीभूमी चवदार तळ्यावरून मशाल मिरवणूक आणण्याचे ठरवण्यात आले.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील साहित्यिक, विद्रोही कवी, साहित्यिक, चित्रकार, कलावंत, विचारवंतांनी संमेलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. या बैठकीचे आयोजन खेड कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल येसोंडेव सचिव सचिन मोहिते यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 31/Dec/2025