महाभारत हे महाकाव्य नाही, तो तर भारताचा इतिहास : धनंजय चितळे

रत्नागिरी : महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, तर भारताचा इतिहास आहे. नीतिमूल्यांपासून मनुष्यस्वभावापर्यंत, युद्धतंत्रापासून व्यवस्थापन कौशल्यापर्यंत आणि अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत सर्वच गोष्टींचे धडे आपल्याला यातून मिळतात. त्यामुळे हे धडे घेण्यासाठी मूळ महाभारताचे बारकाईने वाचन आणि त्यावर चिंतन आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांनी केले.

कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि कीर्तनसंध्या यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवचनकार चितळे यांची दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चितळे यांनी महाभारताच्या अनेक पैलूंचा थोडक्यात आढावा घेतला. दीपप्रज्वलन आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोरेश्वर जोशी यांनी चितळे यांचा परिचय करून दिला. कहऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि कीर्तनसंध्या परिवारातर्फे चितळे यांचे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कन्हऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई यांच्यासह विवेक पुरोहित, शिल्पा पळसुलेदेसाई, तसेच कीर्तनसंध्या परिवारातील अवधूत जोशी, उमेश आंबर्डेकर, नितीन नाफडे, गुरुप्रसाद जोशी, महेंद्र दांडेकर यावेळी उपस्थित होते.

धनंजय चितळे यांनी सांगितले की, महाभारतात महर्षी व्यासांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखांचा अभ्यास आपल्याला जीवनविषयक धडे देऊ शकतो. त्यांनी कोणतेही पात्र पूर्णतः सद्गुणी किंवा पूर्णतः दुर्गुणी रंगवलेले नाही. महाभारताबद्दल असलेले गैरसमज केवळ त्याच्या अभ्यासातूनच दूर होऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 31/Dec/2025