रेल्वेच्या वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवर गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये चढताना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास चेंगराचेंगरीत दहा प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

गाडी फलाटावर येताना ती पकडण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाल्याने दुर्घटना घडली. तिघांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले, तर दोन गंभीर जखमींवर केईएममध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
छटपूजा व दिवाळीनिमित्त गोरखपूरला जाण्यासाठी पहाटे ५.१० वा. सुटणारी अंत्योदय एक्स्प्रेस यार्डमधून प्लॅटफॉर्म १ वर सव्वादोन तास आधीच येत होती. २२ डब्यांच्या या गाडीत सीट पकडण्यासाठी सुमारे अ़डीच ते तीन हजार प्रवासी एकाचवेळी धावले.

प्लॅटफॉर्म तिकीट विक्री १२ स्थानकांवर बंद
मध्य आणि पश्चिम रेल्वेने चेंगराचेंगरी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ आणि गुजरातमधील ४ स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे. दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवरील गर्दी लक्षात घेऊन प्रमुख रेल्वे स्टेशनवर २७ ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेची स्थानके : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर.

पश्चिम रेल्वेवरील स्थानके : मुंबई सेंट्रल , दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधाना, सुरत

जखमींपैकी दोन प्रवाशांकडे तिकीट होते, तर इतरांकडे नव्हते. त्यामुळे ते प्रवासी होते की नातेवाईक हे समजलेले नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थानकावर ३० ते ३५ कर्मचारी तैनात आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे.
– नीरज वर्मा, विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे

वांद्रे टर्मिनसवरून गोरखपूरला जाणाऱ्या २२ डब्यांच्या अनारक्षित अंत्योदय एक्स्प्रेसची प्रवासी क्षमता २०३६ इतकी असतानाही २५४० तिकिटांची विक्री करण्यात आली होती. म्हणजे २२ टक्के अधिक तिकीटविक्री केली गेली, अशी माहिती रेल्वेच्याच अधिकाऱ्यांनी दिली.

ही गाडी पूर्णपणे अनारक्षित असल्याने तिच्या तिकीटविक्रीवर कोणतेही निर्बंध नव्हते. अधिक तिकीटविक्री झाल्याने या गाडीसाठी वाढीव प्रवासी फलाटावर येतील याची कल्पना असूनही गर्दीचे व्यवस्थापन करण्यात पश्चिम रेल्वे प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळेच चेंगराचेंगरी झाल्याचे म्हटले जाते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेची जबाबदारी कमर्शियल स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांची असते. सर्व नियोजन करण्यासाठी टर्मिनसवर ते उपस्थित असतात. परंतु प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार चेंगराचेंगरीवेळी टर्मिनसवर पुरेशी कर्मचारी कुमक नव्हती. गाडी पकडण्याठी एकाचवेळी गर्दी उसळणार याचा अंदाज सुरक्षा कर्मचाऱ्यांना होता. त्यामुळे त्यांनी प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. जर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी नियोजनपूर्वक हाताळली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे म्हटले जाते.

सुरक्षा रक्षक कुठे होते?
वांद्रे टर्मिनसचा प्लॅटफॉर्म क्रमांक १ हा होम प्लॅटफॉर्म असल्याने आत येण्यासाठी तीन गेट आहेत, तर दोन पादचारीपूल आहेत. तेथे सुरक्षा रक्षकांचे नियंत्रण नसल्याचे आढळले.

बराचवेळ रक्ताच्या थारोळ्यात जखमी
रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या जखमींना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असतानाही ते बराचवेळ प्लॅटफॉर्मवरच विव्हळत पडले होते. रेल्वे पोलिस आणि कर्मचाऱ्यांकडे त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी स्ट्रेचरही कमी पडले. काही जखमींना चादरीतून तर काहींना पोलिसांनी खांद्यावरून रुग्णालयात नेले.

रुळांवर चपला
दुर्घटनेनंतर वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर आणि रुळांवर चपलांचा खच पडला होता. सफाई कर्मचाऱ्यांनी त्या चपला, काचा आणि इतर वस्तू १५ ते २० मोठ्या पिशव्यांमध्ये भरल्या.

एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वेने कोणताही धडा घेतलेला नाही. समिती स्थापन करून रेल्वेने फक्त नौटंकी केली. रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे ही दुर्घटना घडली.
– सुभाष गुप्ता,
अध्यक्ष, रेल यात्री परिषद

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 28-10-2024