Girija Desai | धनगर बांधवांनी वन्यजीवापासूनची हानी वेळीच कळवून भरपाई प्रस्ताव दाखल करावे : गिरिजा देसाई

चिपळूण : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जिथे रस्ताही पोचला नाही अशा ठिकाणी वन्यप्राण्याशी रोजचा संबंध येऊनही न डगमगता राहणाऱ्या धनगर बांधवांच्या समस्या जाणून त्याचा पाठपुरावा करत राहणे खूप आव्हानात्मक कार्य आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी पोचल्यावरच त्याची प्रचिती येते. सह्याद्रीत फिरणारे वाघापासून कोणतीही हानी झाली तरी वेळीच वनविभागाला कळवून भरपाई प्रस्ताव दाखल करावे, अशी सूचना जिल्हा वनविभाग प्रमुख गिरिजा देसाई यांनी केली. सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या वतीने गेली पाच वर्ष विविध पाड्यावर साजरा होणाऱ्या वाघ बारस कार्यक्रमात आपल्या सहकाऱ्यासहित उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. धनगर बांधवासोबत चर्चाप्रसंगी महाराष्ट्र राज्य माजी मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी रखडलेला वाडीपर्यंत पोचणारा रस्ता दैनंदिन जीवनात अडथळा ठरत आहे. येथील वस्तुस्थिती, समस्या यावर वन खाते व धनगर बांधवांच्यात समन्वयकाची भूमिका सह्याद्री संवर्धन संस्थेने बजावावी असे सूचित केले.

यावेळी वनखात्याकडून सुमारे ५० उपस्थिताना ब्लँकेट वाटप करण्यात आले तर सह्याद्री संवर्धन संस्थेने सौरकंदील वाटप केले. मान्यवराचे स्वागता प्रित्यर्थ पट्टेरी वाघाचे पंजा प्रतिकृती आणि घुंगरू बांधलेली वेताची काठी भेट देण्यात आली.

आबालवृद्धांनी आमच्या जीवनात हा मोठा आनंदाचा उपक्रम असल्याचे सांगून तोंडाला वाघाचे मुखवटे रंगवून पाणवठ्याचे जागी वाघाला पूजन व आराधना केली. जंगलातील काहीही खा पण आमच्या जनावरे व आम्हास त्रास देऊ नको अशी आर्जव करण्यात आली. हौशी पर्यावरण प्रेमी दोन दिवसापासून यातील आनंद घेत होते. स्वतः गिरिजा देसाई यांनाच वाघ रंगविण्याचा मोह आवरला नाही. हाती ब्रश घेऊन एका मुलाचा चेहराही रंगवला.. याप्रसंगी संस्था अध्यक्ष सोनल प्रभुलकर, सदफ कडवेकर, शिवानंद प्रभुलकर, संजय सुर्वे सौ. श्रद्धा सुर्वे, बबन शेळके यांनी सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 31/Dec/2025