Ratnagiri : मेर्वी येथील श्रीभगवती देवीच्या यात्रोत्सवाला २ जानेवारीला प्रारंभ

गावखडी : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी (भूतेवाडी) येथील जागृत देवस्थान भगवतीदेवीचा यात्रोत्सव २जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त या दिवशी सकाळी भगवती देवीचे मुखवटे लावून देव्हारा भक्तगणांच्या दर्शनासाठी भक्तीमय वातावरणात मंडपात आणला जातो.

यात्रोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळ आदी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. २ जानेवारी रोजी भूतेवाडीतील महिला मंडळातर्फे दुपारी ३ वाजता हळदी-कुंकू समारंभ, भाग्यवान महिलेस देवीच्या मानाची पैठणी साडीचा मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना श्री भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळ मेर्वी भूतेवाडीतर्फे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री आठ वाजता क्रिकेट स्पर्धाचे बक्षीस वितरण केले जाणार आहे. श्री भगवती देवीचा गोंधळ रात्री बारा वाजता भुतेवाडीतील भावकीतर्फे करण्यात येणार आहे. रात्री १२.३० वाजता हिंदी चित्रपट “कांतारा २” दाखवण्यात येणार आहे.

या यात्रोत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी सकाळीच ११ वाजेपर्यंत केली जाते. या यात्रोत्सवात लागणारे पूजा साहित्य, देवीची ओटी, खेळणी, प्रसाद, विविध खाद्यपदार्थ दुकाने व्यापारी थाटतात. यात्रोत्सव निमित्त आर्थिक उलाढाल होत असते. मेर्वी भूतेवाडी येथील श्री भगवती देवी जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी असल्याने भाविकांची अलोट गर्दी दिसून येते.

या सर्व कार्यक्रमाचा व भगवती देवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन मेर्वी येथील श्री भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र भूते, उपाध्यक्ष दीपक भूते आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 31/Dec/2025