Rajapur : अनोळखी परप्रांतीयांची सखोल चौकशी करण्याची मागणी

राजापूर : मागील काही दिवस राजापूर तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर राजापूर शहरात पैसे गोळा करण्यासाठी फिरणाऱ्या अनोळखी परप्रांतीयांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपचे माजी शहर अध्यक्ष संदेश आंबेकर यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी राजापूर शहरात काही परप्रांतीय मंडळी फिरताना आंबेकर यांना आढळून आली होती. त्यांनी तत्काळ चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात तफावत आढळून आली होती. कधी राजस्थान, तर कधी उत्तर प्रदेशातून आल्याचे त्या परप्रांतीय महिलांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले होते. राजापूर शहरात सलग दोन दिवस त्या महिला पैसे गोळा करण्यासाठी फिरत होत्या. त्यामुळे संदेश आंबेकर यांनी तत्काळ राजापूर पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्या महिलांना घेऊन त्यांनी तडक राजापूर पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांच्या निदर्शनास वस्तूस्थिती आणून दिली.

शहरात फिरणाऱ्या त्या महिलांसमवेत एकही पुरुष व्यक्ती कशी नाही, एवढ्या दूरवर त्या कशा काय येऊ शकतात, असे विविध प्रश्न उपस्थित करीत त्या महिलांची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर राजापूर पोलीस ठाण्यातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्या महिलांची चौकशी केली. शहरात फिरणाऱ्या त्या महिला नेमक्या कोणत्या राज्यातील आहेत, त्यांच्याकडे ओळख पटविण्यासाठी कोणता पुरावा आहे, त्यांच्या समवेत आणखी कोणकोण आहेत, समवेत पुरुष मंडळी आहेत कां… असतील तर ते काय करतात…. याबाबत पोलिसांनी कोणती माहिती घेतली त्याचा तपशील समजू शकला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 01/Jan/2026