Sangmeshwar: ओझरखोलची प्राचीन विहीर बुजली गाळात!

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल गावातील पांडवकालीन विहीर ही आजही पूर्णपणे कोरडी झालेली नाही. काही नैसर्गिक झऱ्यांचे पाणी, तसेच पावसाचे पाणी अजूनही या विहिरीत आहे; मात्र महामार्गाच्या बेजबाबदार कामामुळे ही विहीर गाळ, माती, दगड आणि कचऱ्याने भरली गेल्याने पाणी पूर्णतः दूषित झाले आहे.

शुद्ध पाणी देणारी ही विहीर आज लोकांना आजार देणाऱ्या पाण्याचा धोका बनली आहे. या विहिरीवर अवलंबून असलेल्या पाच ते सहा वाड्यांतील ग्रामस्थांना उन्हाळ्यात नळपाणी पुरवठा योजनेतून असूनही थेंबभर पाणी मिळत नाही. अशावेळी याच विहिरीचे पाणी लोकांची तहान भागवते; पण आज परिस्थिती अशी आहे की, तहानलेली माणसे पाणी शोधत जंगलात शिरतात. विहिरीच्या आजूबाजूला झाडी, काटेरी जंगलाचे साम्राज्य पसरले असून, ही ऐतिहासिक विहीर शोधावी लागते. महामार्गाच्या कामात कोणतेही शास्त्रीय नियोजन न करता रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यातून निघालेली माती, दगडधोंडे थेट विहिरीच्या दिशेने ढकलण्यात आले. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने ही सगळी माती विहिरीत जाऊन साचली. परिणामी, विहिरीतील नैसर्गिक झऱ्यांचे मार्ग अंशतः बंद झाले असून, पाणी साचून राहिले आहे. स्वच्छता नसल्याने हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. तरीही पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना तेच पाणी वापरण्याची वेळ येत आहे. काम सुरू असताना अनेकवेळा कामगारांना विहिरीला धोका पोहोचेल याची जाणीव करून दिली होती. पण याकडे ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. आज दोन वर्षे उलटून गेली, तरी लवकरच गाळ काढू, निधी मिळाल्यावर काम करू, अशी पोकळ आश्वासनेच दिली जात आहेत. तहान, आरोग्य, विश्वास धोक्यात ही प्राचीन विहीर म्हणजे केवळ पाण्याचा साठा नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या लोकांचे जीवन जगवणारी श्वासवाहिनी आहे. महामार्ग विकासाच्या नावाखाली या विहिरीचा घात करून प्रशासनाने ग्रामस्थांची तहान, आरोग्य आणि विश्वास तिन्ही गोष्टींवर घाव घातला आहे. तत्काळ गाळ काढणे, स्वच्छता करणे आणि विहिरीचे संरक्षण करणे ही केवळ मागणी नसून प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा या संतापाचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 01-01-2026