रत्नागिरी : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली असून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात तब्बल दीड कोटींहून अधिक महिला, ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर राज्यभरात आठ महिन्यात ४१ कोटींहून अधिक महिला, ज्येष्ठांनी प्रवास केला आहे. या योजनेचा लाभ सगळ्यात जास्त तरूणी, महिला यांनी घेतला असून रत्नागिरी विभागास मोठे उल्पन्न मिळाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूणींमुळे लाडकी लालपरी जिल्ह्यासह राज्यात सुसाट धावत आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षावरील नागरिकांसाठी एसटी बसचा प्रवास मोफत तर ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्यात आली होती. या सवलतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महिला, तरूणी, ज्येष्ठ नागरिकांनी मोठा लाभ घेतला आहे. वाट पाहीन मात्र लालपरीनेच जाईन यामुळे दिवसेंदिवस महिला, तरूणी, ज्येष्ठ नागरिकांना प्रतिसाद वाढत चालला आहे.
रत्नागिरी विभागात नव्या स्मार्ट बसेस, ई-बसेस, सीएनजी बसेस आल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढत चालला आहे. कोट्यावधीचे उत्पन्न एसटी विभागास मिळाले आहे. मागील काही वर्षात लालपरीला अच्छे दिन आले असून महिला, ज्येष्ठ नागरिकांची आधार बनली आहे.
लाल परीत सवलतधारक तरूणी, महिलांची संख्या वाढतेय
एसटी बसमधून प्रवासासाठी महिला, तरूणींना तिकीटात ५० टक्के सवलत दिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोट्यावधीचे उत्पन्न एकट्या रत्नागिरी विभागाला मिळाले आहे.
रत्नागिरी विभागातील ९ आगारात महिला, तरूणी, ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस सवलतधारकांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे एसटी विभागास ही उत्पन्न मिळत आहे-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
सवलतीमुळे महिला, ज्येष्ठांची होतेय गर्दी, महामंडळास रक्कम अदा
राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात एसटीने तब्बल ४१ कोटी ३९ लाख महिलांनी तर १८ कोटी १ लाख ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. रोजच्या सुमारे ५५ लाख प्रवाशांमध्ये २० लाख महिला आणि ५ लाख ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दीड कोटींहून अधिक सवलतधारकांनी प्रवास केला आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेच्या प्रतिपूर्तीपोटीची रक्कम म्हणून सरकारने २ हजार ४३० कोटी ३ लाख रूपये महामंडळास गेल्या आठ महिन्यात अदा केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 01/Jan/2026














