इंटरनेटचा वापर सकारात्मक उद्देशासाठी करावा : डॉ. अक्षय फाटक

राजापूर : विद्यार्थ्यांनी मोबाइल व इंटरनेटचा वापर सकारात्मक आणि शैक्षणिक उद्देशासाठी करावा, असे आवाहन डॉ. अक्षय फाटक यांनी केले. त्याचबरोबर डिजिटल युगात मोबाइल व सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जवळेथर येथील आदर्श केंद्रशाळेत युवराज मोरे, आई पावणादेवी युवा मित्रमंडळ, संदीप मोरे तसेच युवराज मोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने मोबाइल, सोशल मीडिया व सायबर संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अक्षय फाटक यांनी सायबर फसवणूक म्हणजे काय, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदार वापर, अनोळखी लिंक, कॉल व मेसेजपासून कसे सावध राहावे, पासवर्ड सुरक्षिततेचे महत्त्व तसेच वैयक्तिक माहिती शेअर करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जवळेथर केंद्रशाळेचे मुख्याध्यापक संदीप परटवलकर यांच्यासह आजिवली क्रमांक १ व क्रमांक २ शाळेमधील शिक्षक, उदय राणे, संदीप मोरे, सुषमा मोरे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 01/Jan/2026