संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा-कोंडगाव येथे वास्तव्यास असणारा व बाजारपेठमध्ये आपला किराणा मालाचे दुकान असणाऱ्या विवेक (विकी) गुरुपादगोळ या तरुणाने प्रचंड इच्छाशक्ती व धैर्याच्या जोरावर साखरपा-नेपाळ हा आंतराष्ट्रीय बाईक रायडींगचा ट्रेक पूर्ण केला. त्याच्या या साहसाचे साखरपा सह संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. हा पूर्ण प्रवास 5400 किमीचा असल्याचे त्याने सांगितले. त्याची हिमालया ही बाईक असून आपल्याला बाईकची उत्तम साथ मिळाली असे सांगितले.
12 डिसेंबर ला त्याने हा प्रवास सुरु केला. या प्रवासात साखरपा मुंबई इंदोर-कानपुर-नेपाळ – बुटवाल अशा प्रकारे त्याने दहा दहा दिवसात हा टप्पा पार केला. 24 डिसेंबरला साखरपा या ठिकाणी या दौऱ्याची सांगता झाली. दररोज सकाळी 5 ते सायंकाळी 7 या वेळात सुमारे 700 किमी अंतर प्रती दिवशी त्याने पार पाडले. त्यामुळे हा प्रवास किती जिकरीचा असेल याची आपल्याला कल्पना आली असेल. या प्रवासात त्याचा सहकारी कोल्हापूर मधील जयदीप नाळे सोबत होता. त्याचे देखील उत्तम सहकार्य लाभले. या आधी सुद्धा विवेक याने अनेक बाईक रायडींग ट्रेक पूर्ण केले आहेत. यामध्ये 7000 किमीचा अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लेह, लडाख, कन्याकुमारी हे दौरे केले आहेत.
आपण काहीतरी सर्वापेक्षा वेगळे साहस करावे, बाईक चालवण्या छंद या प्रेरणेतून आपण वर्षातून एकदा माझा व्यवसाय सांभाळून हा दौरा करत असल्याचे सांगितले. माझ्या सर्व कुटुंबियांची मला उत्तम साथ व देवाचा आशीर्वाद यामधूनच दौरा सुखरूप पार पडत असल्याचे सांगायला तो विसरला नाही. त्याला या पुढे हिमाचल प्रदेशातील स्मिती हा सर्वात कठीण असणारा ट्रेक करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. तसेच जे बाईक रायडर ट्रेक करतात त्यांनी मार्गदर्शक तत्वाचा वापर करावा, सेफ्टी किट, व्यवस्थित गियर शिफ्टिंग, वेगाची मर्यादा, कोणतीही अतिशोक्ती करू नये असा संदेश देत नवीन रायडरना प्रेरणा दिली. तरुण वयात फिरून घ्या असा सल्ला त्याने दिला. या छंदातून आनंद मिळतो, जगण्याची नवी उमेद मिळत असल्याचे त्याने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 01/Jan/2026














