रत्नागिरीत लाचखोर तलाठी जाळ्यात! ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक; वर्षाच्या पहिल्याच दिवशी एसीबीचा दणका

रत्नागिरी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१ जानेवारी २०२६) रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Ratnagiri ACB) धडाकेबाज कारवाई केली आहे. जमिनीच्या खरेदी खतानंतर ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागणारा चाफे (Chafe) सजाचा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून, त्याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

नेमका प्रकार काय?

तक्रारदार यांनी रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ (Agarnaral) येथे १० गुंठे बिनशेती जमीन खरेदी केली होती. या जमिनीचे खरेदी खत झाल्यानंतर ७/१२ उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी (फेरफार नोंद) त्यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी तलाठी कार्यालय, चाफे येथे रीतसर अर्ज केला होता. तलाठी बजरंग चव्हाण याने हा अर्ज स्वीकारला, परंतु फेरफार नोंद करून नाव दाखल केलेला ७/१२ चा उतारा आणि फेरफारची प्रत देण्यासाठी तक्रारदाराकडे १०,०००/- रुपयांच्या लाचेची मागणी केली.

सापळा आणि कारवाई

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ३१ डिसेंबर २०२५ रोजी रत्नागिरी एसीबीकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी १ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली. पडताळणी दरम्यान तलाठी चव्हाण याने १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे आणि स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने चाफे येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला. यावेळी पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी बजरंग चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात (Jaigad Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपीची माहिती:

  • नाव: बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१)
  • हुद्दा: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), सजा चाफे, ता. जि. रत्नागिरी.
  • सध्याचा पत्ता: ओम शांती अपार्टमेंट, रुम नं. ५, शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी.
  • मूळ गाव: मु.पो. कोणेगांव, ता. कराड, जि. सातारा.

पोलिस पथक

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिर्के आणि रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक मच्छिद्र जाधव, सपोफौ उदय चांदणे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, समिता क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांचा समावेश होता.

नागरिकांना आवाहन कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी एसीबीने केले आहे.

  • टोल फ्री क्रमांक: १०६४
  • व्हॉट्सॲप क्रमांक: ७०३८३९१०६४
  • संपर्क: ०२३५२/२२२८९३