रत्नागिरी पालिकेत ‘निष्ठे’ला फळ! बाळू साळवी होणार शिवसेनेचे गटनेते; पालकमंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या (Ratnagiri Municipal Council) राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरी नगरपालिकेच्या शिवसेना गटनेतेपदी (Group Leader) प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक दत्तात्रय उर्फ बाळू साळवी (Balu Salvi) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निवडीची अधिकृत घोषणा लवकरच शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांच्याकडून करण्यात येणार आहे.

निष्ठेची कसोटी आणि बाळू साळवींचा ‘राजकीय धर्म’

बाळू साळवी हे मंत्री उदय सामंत यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत बाळू साळवी यांच्या निष्ठेची खरी कसोटी लागली होती. या निवडणुकीत उबाठा गटाकडून (UBT Shiv Sena) नगराध्यक्ष पदासाठी शिवानी माने या रिंगणात होत्या. विशेष म्हणजे शिवानी माने या बाळू साळवी यांच्या घरातील, जवळच्या नात्यातील व्यक्ती आहेत. एका बाजूला रक्ताचे नाते आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचा आदेश, अशा द्विधा मनस्थितीत असतानाही बाळू साळवी यांनी ‘पक्षादेश’ शिरसावंद्य मानला.

आपल्याच घरातील व्यक्ती विरोधात उभी असतानाही त्यांनी उदय सामंत यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे (शिंदे गट) काम निष्ठेने केले. त्यांनी कौटुंबिक संबंधांपेक्षा राजकीय धर्म आणि निष्ठेला प्राधान्य दिले. त्यांच्या याच त्यागाची आणि निष्ठेची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी त्यांची गटनेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

प्रभाग क्र. ८ चे प्रतिनिधित्व

बाळू साळवी हे रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांच्या खांद्यावर गटनेतेपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली असून, आगामी काळात नगरपालिकेत शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडण्याचे काम ते करतील. त्यांच्या या निवडीमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.