दिमाखदार सोहळ्याने ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू

छत्रपती शाहू महाराजनगरी (सातारा) : माजी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाच्या उद्‍घाटनाने व ध्वजवंदनाने गुरुवारी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बिगुल वाजला.

सायंकाळी शहरातून मोठ्या उत्साहात निघालेल्या ग्रंथदिंडीने ग्रंथ, विचार व वाचन संस्कृतीच्या जागराला दिमाखदार सुरुवात झाली. त्यामुळे राजधानी साताऱ्यातील वातावरण साहित्यमय झाले होते. आज सकाळी ११ वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संमेलनाचे औपचारिक उद्‍घाटन होणार आहे. सुरुवातीला डॉ. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ‘‘शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पनांतून वाचनसंस्कृतीला नवे बळ मिळू शकते. मुले म्हणजे फुले, तीच उद्याची आशेचा किरण आहेत. त्यांना लहानपणापासून साहित्याशी जोडणे अत्यावश्यक आहे. मोबाईलचा सकारात्मक वापर करून विद्यार्थ्यांना पुस्तकांचा ‘जिवंत अनुभव’ द्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले.

याप्रसंगी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, नंदकुमार सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संमेलनातील कवी कट्टा, प्रकाशन मंच आणि गझल कट्ट्याचे उद्‍घाटन संमेलनाध्यक्ष विश्‍वास पाटील, उद्योजक भालचंद्र जोशी व संदीप शहा यांच्या हस्ते झाले. साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमांना साहित्यिक, लेखक, वाचकांनी उत्स्फूर्त हजेरी लावल्याने साताऱ्याची साहित्यनगरी फुलून गेली होती. दुपारी साडेचारला येथील गांधी मैदानावरून मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. विविध शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेप्रमाणे चित्ररथ साकारले होते. यामध्ये भारतीय संत साहित्य, ज्ञानरथ सावित्रीचा आणि सावित्रीबाई शैक्षणिक कार्यावरील देखावा, मराठी साहित्याची परंपरा, स्वातंत्र्य आंदोलनातील साहित्य, सातारा पर्यटन, भारतीय संस्कृती, लोकसाहित्य व वारसा, आधुनिक साहित्य, सामाजिक सुधारकरांच्या कार्यावरील माहिती देणारी सजावट, साताऱ्याची साहित्य परंपरा, शाहिरांची परंपरा, रहिमतपूर पंचक्रोशीतील साहित्य परंपरा, सामाजिक सुधारकांच्या कार्यावरील देखावा, ज्ञानाचे प्रतिकात्मक चित्र, तुकारामाचे भारुड, पर्यावरणाचे संरक्षणपर देखावा, स्त्री शिक्षण आणि समाजजागृती, भक्ती साहित्य, वेद उपनिषद रामायण व महाभारत आदी विषयांवर चित्ररथ साकारले होते. या दिंडीचे हजारो सातारकरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून कौतुक केले. मुख्यमंत्री उद्या (शुक्रवारी) सकाळी संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात येत आहेत. सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ लेखिका डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते, तसेच संमेलनाध्यक्ष विश्‍वास पाटील, मराठी भाषामंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्‍घाटन होणार आहे. दुपारी तीन वाजता कवी अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत सहभागी कवींचे कविसंमेलन, दुपारी तीन ते पाच या वेळेत ‘संवाद बालकुमार वाचकांशी’ हा कार्यक्रम लेखक ल. म. कडू, एकनाथ आव्हाड यांच्या उपस्थितीत, दुपारी तीन वाजता जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे? या विषयावर परिचर्चा होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:54 02-01-2026